www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय पुरुषांनी हॉकी क्वालिफायर टुर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा मुकाबला फ्रान्सशी होणार आहे. लंडनं ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारताला फायनल मॅच जिंकावीच लागणार आहे. २००८ बीजींग ऑलिंपिकमध्ये २८ वर्षानंतर भारताला हॉकीमध्ये क्वालिफाय करता आलं नव्हतं. क्वालिफायरमध्ये विजय मिळवता आला नसल्यानं, ऑलिंपिकमध्ये मेडल पटकावण्याच भारताचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं.
या मानहानिकारक पराभवामुळेच भारताला हॉकीचा सर्वात खराब काळ पाहावा लागला होता. आता, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकसाठी क्वालिफाय करण्याच आव्हान भारतीय हॉकी टीमसमोर आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या क्वालिफाईंग टुर्नामेंटमध्ये भारतानं सलग पाच विजय मिळवत फायनलमध्ये ध़डक मारली आहे. भारतानं पोलंडचा शेवटच्या लीग मॅचमध्ये ४-२ नं पराभव केला. फायनलमध्ये विजय मिळवण्यासाठी हॉकी टीमला फ्रान्सचं आव्हान पार करावं लागणार आहे. लीग मॅचमध्ये भारतानं फ्रान्सचा ६-२ नं धुव्वा उडवला होता. त्यामुळे या मॅचमध्ये भारतीय हॉकी टीमच फेव्हरिट असणार आहे. त्याचप्रमाणे घरच्या चाहत्यांचा पाठिंबाही त्यांना मिळणार आहे.
सलग पाच विजय मिळवल्यानं टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. लंडन ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारताला केवळ एक विजय हवा आहे. भारतीय हॉकी टीमनं टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे आपली शेवटची मॅच जिंकत दिमाखात लंडन ऑलिंपिकसाठी क्वालिफाय करण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असणार आहे. संदीप सिंगकडून मोठ्या अपेक्षा टीमला आहेत. टुर्नामेंटमध्ये भारताच्या विजयात त्यानं निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे फायनलमध्ये तो याचीच पुनरावृत्ती करण्यास आतूर असेल. आता भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखत फायनलमध्येही बाजी मारते का? याकडेच साऱ्या हॉकी प्रेमींच लक्ष असेल.