www.24taas.com, अहमदाबाद
शाहिद आफ्रिदीनं एकदिवसीय क्रिकेट संन्यासाचं वक्तव्य करून पाक क्रिकेट जगतात एकच खळबळ उडवून दिलीय. श्रीलंका दौऱ्यावरून परतलेल्या आफ्रिदीनं आपण आतापासून टी-20 वर लक्ष देणार असून, त्यासाठी एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचं सांगितलंय. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडूंच्या पडद्यामागून खेळल्या जाणाऱ्या खेळावर टीका होतेय.
‘मी काही जेष्ठांशी चर्चा करून काही दिवसांत याविषयी निर्णय घेणार आहे. माझा एकदिवसीय खेळामध्ये परफॉर्मन्स चांगला नसेल तर निश्चितच या सामन्यांमधून माझा संन्यास घेण्याचा निर्णयच योग्य राहील’ असं वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं केलं होतं. सप्टेंबर 2012 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप टी-20 साठी तयारी करण्याचा मानसही त्यानं बोलून दाखवला. तसंच या सामन्यांत तरुण खेळाडूंना संधी मिळायला हवी, अशी इच्छाही त्यानं व्यक्त केलीय. आफ्रिदीनं याआधीच टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकलाय. आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यामधला आपला खेळामुळे तो आणखी निराश झालाय.
क्रिकेट तज्ज्ञ मात्र आफ्रिदीच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावतायत. एका विश्लेषकाच्या म्हणण्यानुसार, ‘कोच डेव वॉटमोर यांच्या तरुण खेळाडूंना संधी देऊन सिनीअर खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणामुळे कदाचित आफ्रिदीनं हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. कॅप्टनपदावरून हटवल्यानंतरही आफ्रिदी निराश झाला होता. तसंच श्रीलंका दौऱ्याअगोदर टी-20 सामन्यांसाठी कॅप्टन म्हणून आफ्रिदीच्या नावाचा विचारही केला नाही, त्यामुळेही त्याच्या निराशा वाढतच होती.’
.