आयपीएल – क्रिकेटचा ‘विद्रूप’ अवतार

क्रिकेटला फायदा होण्यासाठी क्रिकेटचं एन्टरटेन्मेंट पॅकेज तयार करण्यात आलं. मात्र, पैशाचा हव्यास, ग्लॅमर आणि एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली क्रिकेटमध्ये वेगळाच तमाशा सुरु झाला.

Updated: May 27, 2012, 06:17 PM IST

www.24taas.com

 

क्रिकेटला फायदा होण्यासाठी क्रिकेटचं एन्टरटेन्मेंट पॅकेज तयार करण्यात आलं. मात्र, पैशाचा हव्यास, ग्लॅमर आणि एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली क्रिकेटमध्ये वेगळाच तमाशा सुरु झाला. एकीकडे सचिन, द्रविडसारख्या प्लेअर्सनी क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा पुरेपूर आनंद दिला. पण, आयपीएलच्या एन्टरटेन्मेंट तमाशामुळे मात्र क्रिकेटला कलंकितच केलं.

 

एकेकाळी क्रिकेट म्हणजे भारतीयांचा धर्म समजला जायचा. संपूर्ण देश या एकाच खेळामुळे बांधला गेलाय. कपिल देव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारख्या प्लेअर्सनी या 'जन्टलमन गेम'ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र, क्रिकेटची प्रसिद्धी वाढत असतानाच या खेळाचं व्यापारीकरणंही सुरु झालं. टेस्ट मॅचेसची जागा कधी वनडेनं घेतली आणि वनडेला टी-२०नं कधी ओव्हरटेक केलं, हे कोणालाच कळलं नाही.

 

हे सर्व घडत असतानाच क्रिकेटमध्ये एन्टरटेन्मेंट घुसवण्यात आलं आणि सुरू झाला क्रिकेटच्या अधोगतीचा प्रवास. क्रिकेटला तडका देण्यासाठी मैदानावर प्लेअर्ससोबत चीअर लीडर्सचा तमाशाही सुरु करण्यात आला. क्रिकेटचं एन्टरटेन्मेंट पॅकेज करून त्यावरून पैशाची छपाई कशी करायची याचाच विचार व्हायला लागला. मॅचनंतर खेळांबाबत समीक्षण होण्याऐवजी पार्ट्यांमध्ये प्लेअर्स दिसू लागले. प्लेअर्सला देशापेक्षा पैसा मोठा वाटू लागला. देशासाठी खेळण्याऐवजी आयपीएलसारख्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यातच युवा प्लेअर्सला धन्यता वाटू लागली. मैदानावरील कामगिरीपेक्षा फिक्सिंग, पार्टीमध्ये धिंगाणा यामुळे क्रिकेट बदनाम झालं. क्रिकेटमधील अपप्रवृत्ती समोर आल्या. क्रिकेटची बदनामी अधिक झाली. त्यामुळेच आतातरी क्रिकेटमधील हा सर्व धिंगाणा थांबवून बीसीसीआयनं खेळाकडे जास्त लक्ष दिलं तर योग्य होईल, अशी आशा प्रत्येक क्रिकेटप्रेमी करतोय.