www.24taas.com, ऍडलिड
भारता विरुध्दच्या कसोटी मालिका ४-० अशी जिंकल्या शिवाय आमच्या संघाला समाधान लाभणार नसल्याचं ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने म्हटलं आहे. भारताने या मालिकेत लागोपाठ तीन कसोटी सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना केला आहे. मालिकेतील शेवटची कसोटी ऍडलिड ओव्हल येथे २४ जानेवारी पासून सुरु होणार आहे.
आता आम्ही फक्त भारताला ४-० असं हरवून व्हाईट वॉश देण्याचाच विचार करत आहोत. भारतीय संघाला ४-० असं मालिकेत पराभूत न करु शकल्यास आमच्यासाठी ते निराशाजनक असेल असं क्लार्कने द टेलिग्राफमधल्या आपल्या स्तंभात लिहिलं आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला पर्थ कसोटीत पराभूत करुन मालिका खिशात टाकल्यामुळे आम्हाला खुप समाधान लाभलं. पण अद्याप कामगिरी फत्ते झालेली नाही त्यामुळे माझे संघातील सहकारी सर्तक आहेत. भारता विरुद्धची ऍडलिडचा सामना सर्वात कठिण आव्हान असेल असं क्लार्कला वाटतं.
ऑस्ट्रेलिया ऍडलिडच्या मैदानावर भारताला १९९९-०० च्या मालिकेनंतर एकदाही पराभूत करु शकलेली नाही. मागच्या महिन्यात न्युझिलँड विरुध्द निराशाजनक कामगिरी नंतर भारताला आस्मान दाखवणाऱ्या कामगिरीचा माझ्या संघातील सहकाऱ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे.