भारत-पाक वन डे मालिकेला मंजूरी

भारत आणि पाकि‍स्‍तानात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्या बऱ्याच काळापासून बंद असलेल्या क्रिकेट मालिकेला मंजूरी मिळाली आहे. पाकिस्‍तानी क्रिकेट संघ येत्‍या डिसेंबरमध्‍ये भारताच्‍या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन एक दिवसीय सामने होणार आहेत.

Updated: Jul 16, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, नवी दिल्‍लीः

 

भारत आणि पाकि‍स्‍तानात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्या बऱ्याच काळापासून बंद असलेल्या क्रिकेट मालिकेला मंजूरी मिळाली आहे. पाकिस्‍तानी क्रिकेट संघ येत्‍या डिसेंबरमध्‍ये भारताच्‍या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन एक दिवसीय सामने होणार आहेत. तब्‍बल 5 वर्षांनंतर दोन्‍ही देशांमध्‍ये मालिका होणार आहे. भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍या क्रिकेट सामन्‍यांची मालिका व्‍हावी, यासाठी दोन्‍ही देशांच्‍या मंडळांचे प्रयत्‍न सुरु होते. परंतु, सरकारने मंजूरी दिली नव्‍हती. आता मंजूरी मिळाली आहे.

 

 

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या टूर अँड फिक्स्चर्स समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका २२ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येईल का, या दृष्टीने चाचपणी झाली. भारत दौऱ्यावर येणारा इंग्लंड संघ नाताळच्या सुटीसाठी २२ डिसेंबरला मायदेशी परतणार आहे. त्‍यानंतर वन डे मालिकेसाठी इंग्‍लंडचा संघ परतणार आहे. या कालावधीत भारत-पाक सामन्‍यांची मालिका खेळविणे शक्‍य आहे.

 

 

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या वन डे सामन्यांच्या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यामुळे २३ डिसेंबर ते ११ जानेवारी वीस दिवसांच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान संघांमधली तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवता येईल, यावर भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात सहमती झाल्याचं वृत्त आहे. आता दोन्ही बोर्डांचे पदाधिकारी या मालिकेला भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

 

 

मुंबईवर 2008 मध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर दोन्‍ही देशांमध्‍ये तणाव निर्माण झाला. त्‍यानंतर क्रिकेट मालिका खेळविण्‍यात आली नाही. दोन्‍ही संघ केवळ आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेतच खेळले. त्‍यात विश्‍वचषक, आशिया चषक, टी20 विश्‍वचषक अशा स्‍पर्धांचा समावेश होता. गेल्‍या वर्षी मोहाली येथे दोन्‍ही संघ विश्‍वचषकाच्‍या उपांत्‍य सामन्‍यात आमनेसामने आले होते.