www.24taas.com, पुणे
खासदार झाल्यावर पहिल्यांदाच सचिनने पुण्यामध्ये मुलाखत दिली. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिनची मुलाखत घतेली. यावेळी वर्ल्ड कपच्या तय़ारीपासून ते खासदारकीच्या नामांकनापर्यंत वेगवेगळया प्रश्नांवर सचिनने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. माझं क्रिकेटमधील योगदान पाहूनच मला खासदार केलं गेलं आहे. त्यामुळे मी कायम क्रिकेटपटूच असेन, राजकारणी नाही, असं यावेळी सचिनने सांगितलं. याशिवाय तरुणांसाठी आदर्श असणाऱ्या सचिनने तरुणांना काही मोलाचे सल्लेही दिले. तमाम मराठी जनतेला सचिनने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
सचिनच्या मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे-
शिक्षण हे कायम तुमच्याकडे राहातं. तीच तुमची शक्ती आहे. जरी मी खूप शिकलो नसलो, तरी मी हेच सांगेन की प्रत्येकालाच मोठा खेळाडू बनता येतंच असं नाही. पण शिक्षण सोडू नका.
वर्तमानावर लक्ष एकाग्र केलं की इतर विचार मनात येत नाहीत. त्यामुळे टेन्शन जाणवत नाही. मन पूर्णपणे कोरं ठेवून काम केलं तर टेन्शन येत नाही. समस्येकडे समस्या म्हणून न बघता संधी म्हणू पाहिलं तर समस्येवरचा उपाय नक्की सापडतो
मी अपनालय अनाथाश्रमामधील जवळपास ४०० मुलांना आर्थिक मदत करतो. तसंच वेगवेगळ्या संस्थांना दान करतो. पण, या गोष्टीची मी कधी वाच्यता केली नाही. कारण मला त्याबद्दल बोलायला आवडत नाही. पण तरुणांनी नेहमीच लोकांना मदत करावी.
आपल्या मध्यमवर्गीय संस्कारांबद्दल बोलताना सचिन म्हणाला मी कौतुक आणि टीका दोन्हीकडे तटस्थपणे पाहू शकतो, कारण माझ्यावर तसेच संस्कार झाले आहेत. आजही मी शतक झळकवलं की घरात आई देवापुढे गोड नैवेद्य ठेवते.
आपल्या खासदारकीबद्दल बोलताना सचिन म्हणाला जेव्हा माननीय राष्ट्रपती मोठमोठ्या नावांच्या बरोबरीने तुमचं नाव नियुक्त करतात. तेव्हा तो तुमचा सन्मान असतो. त्यामुळे जेव्हा राष्ट्रपतींनी जेव्हाणाझं नाव खासदारकीसाठी निवडलं, तेव्हा मी ते पद स्वीकारलं. पण मी खासदार जरी झालो, तरी मी sportsmanच राहाणार हे सद्धा सचिनने ठणकावून सांगितले. पृथ्वीराज कपूरपासून ते लतादीदींपर्यंत मोठमोठ्या लोकांना अशी खासदारकी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरीने माझं नाव निवडणं हा माझा सन्मान आहे.
पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल सचिन सार्वजनिक ठिकाणी बोलला. आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं फार महत्त्वाचं असतं. अंजलीबद्दल आमच्या दोघांच्या घरून पाठिंबा होता. त्यामुळेच १९व्या वर्षी लग्न केलं. अंजलीसारखी पत्नी मिळाल्याबद्दल देवाचे आभार ही सचिनने मानले.
वर्ल्ड कप जिंकलो, याहून मोठा दिवस मी आयुष्यात कधीच बघितला नाही. जिंकल्यावर माझ्या गाडीवर चढून क्रिकेट फॅन्स नाचत होते. पण मी कुणाला अडवलं नाही. कारण मी ही तितकाच आनंदी झालो होतो. असं सचिन वर्ल्ड कपमधील विजयाबद्दल म्हणाला.