वीरुने काढला दादाचा वचपा!

दिल्लीत झालेल्या सामन्यात दादाच्या पुणे वॉरिअर्सने वीरूच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खुर्दा केल्यानंतर वीरूने आज पुण्यातील सामन्यात हल्लाबोल करत पुणे वॉरिअर्सचा ८ गडी राखून पराभव केला.

Updated: Apr 24, 2012, 07:50 PM IST

www.24taas.com, पुणे

 

दिल्लीत झालेल्या सामन्यात दादाच्या पुणे वॉरिअर्सने वीरूच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खुर्दा केल्यानंतर वीरूने आज पुण्यातील सामन्यात हल्लाबोल करत पुणे वॉरिअर्सचा ८ गडी राखून पराभव केला.

 

 

दिल्लीने पुण्याच्या १४७ धावांचे लक्ष्य १६ षटकातच पूर्ण केले. यात दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागाच्या झंझावती खेळाचा समावेश आहे. त्याने ४८ चेंडूत चौफेर फटकेबाजी करत ८७ धावा केल्या. सेहवाग आणि टेलर (९) नाबाद राहिले. सलामीचा फलंदाज जयवर्धने १८ धावांवर धावबाद झाला. केव्हिन पीटरसन २७ धावांवर शर्माच्या गोलंदाजीवर रायडरकडे झेल देत बाद झाला.

 

कर्णधार सौरभ गांगुलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीला आलेला जेसी रायडर पहिल्याच षटकाच्या दुस-या चेंडूवर शुन्यावर बाद झाला. गोलंदाज इरफान पठाणने दिल्लीला हे पहिले यश मिळवून दिले.

 
रायडरच्या जागेवर खेळायला आलेला दादा दुस-या षटकाच्या दुस-या चेंडूवर नदीमकडे झेल देत बाद झाला. त्यावेळी फलकावर एक धाव झळकत होती.  गांगुली केवळ चार चेंडू खेळत एक धाव काढून बाद झाला.  पुणे वॉरियर्सने निर्धारित २० षटकात १४६ धावा केल्या आहेत.

 

 

रायडर आणि गांगुली बाद झाल्यानंतर मनिष पांडे (८०) आणि रॉबिन उथप्पाने (६०) क्रिजवर जम बसवत पुण्याला १४६ धावांपर्यंत नेऊन सोडले.

 

 

दिल्ली डेअरडेव्हिल्सने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यातील चार सामन्यात त्यांनी विजय मिळविला आहे. डेअरडेव्हिल्सला सात एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मात दिली. त्यानंतर सलग चार सामन्यात त्यांना विजय मिळाला मात्र पाचव्या विजयाच्या प्रयत्नात असलेल्या दिल्लीला पुणे वॉरियर्सने रोखले.