www.24taas.com, पुणे
आयपीएल ५ मध्ये खराब कामगिरी करणाऱ्या पुणे वॉरियर्स संघाचा कर्णधार सौरव गांगुलील उर्वरित सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉयल चँलेजर्स बेंगळूरू यांच्याविरूद्धच्या सामन्यापूर्वी होणा-या बैठकीत उर्वरित सामन्यांमध्ये गांगुलीकडून कर्णधारपद काढून घेण्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
परंतु, हा निर्णय घेणे संघ व्यवस्थापनाला सोपे जाणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गांगुलीने स्वत:च उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी यासाठी संघ व्यवस्थापनाकडून प्रयत्न केला जाईल.
गांगुलीने कर्णधारपद सोडले किंवा उर्वरित तीन सामन्यात बाहेर बसण्याचा निर्णय घेतला तर त्याचे आम्ही स्वागत करू असे व्यवस्थापकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. गांगुली कर्णधारपदी असल्यास संघाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला तर त्याचा नव्या खेळाडूंवर विपरीत परिणाम होईल, अशी संघ व्यवस्थापनाची धारणा आहे. गांगुलीला डच्चू दिल्यास मायकल क्लार्क किंवा स्टीव स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या या सिझनमध्ये पुण्याने १३ पैकी ९ सामने गमावले आहेत. तसेच या सामन्यांमध्ये सौरव गांगुलीला फलंदाज म्हणून आणि गोलंदाज म्हणून फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आहे.