www.24taas.com, मुंबई
पाकिस्तान-इंडिया क्रिकेट सीरीजवर चौफर शाब्दिक हल्ला होत असताना आता खुद्द ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी तोफ डागली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला कसा विसरू, असा सवाल करीत दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी क्रिकेट सामने खेळून पाकिस्तानशी संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यास कडाडून विरोध केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये हिंदुस्थान दौर्यावर येणार असून या दोन्ही देशांत एकदिवसीय क्रिकेट मालिका होणार असल्याची घोषणा हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने सकाळी केली. या दोन संघांमध्ये गेल्या पाच वर्षांत क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. क्रिकेट नियामक मंडळाने केलेल्या या घोषणेनंतर देशभरातून त्याला विरोध सुरू झाला आहे.
गावसकर यांनी सर्वप्रथम या निर्णयावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ‘मी मुंबईकर आहे. त्यामुळेच मुंबईवर झालेला हल्ला विसरता येत नाही. या हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तान बिलकूल सहकार्य करीत नाही, असे असताना पाकिस्तानशी पुन्हा संंबंध प्रस्थापित करण्याची एवढी घाई कशासाठी?
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ हिंदुस्थान दौर्यावर येणार आहे.
कसोटी मालिकेनंतर हा संघ नाताळच्या सुट्टीसाठी मायदेशी परत जाणार असून एकदिवसीय मालिकेसाठी जानेवारीत पुन्हा येणार आहे. या मधल्या काळात हिंदुस्थान-पाकिस्तान मालिका खेळवली जाणार आहे. याकडे लक्ष देऊन गावसकर म्हणाले, ‘हा असा कार्यक्रम आखल्याने खेळाडूंना श्वास घ्यायलाही मिळणार नाही. खरं तर इंग्लिश संघ सुट्टीवर असताना आपल्या खेळाडूंनाही विश्रांती घेण्याची संधी द्यायला हवी होती, पण त्यांना थकवण्यात काय अर्थ आहे?