मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले

Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. 

Updated: Oct 20, 2021, 09:43 AM IST
मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले title=

नवी दिल्ली : Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र अवकाळी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. देशातील अनेक राज्ये या अवकाळी पावसाच्या वेदना सहन करत आहेत आणि उत्तराखंड आणि केरळची स्थिती सर्वात वाईट आहे. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसाचा मोठा तडाखा अनेक राज्यांत बसला आहे. उत्तराखंडात ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. चारधाम यात्रेसाठी गेलेले हे भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

महाष्ट्रात उत्तर भागात आणि विदर्भ, मराठवाड्यात बसला आहे. तर केरळ राज्यातही पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. आता तर उत्तराखंडमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनच्या घटनाही घडल्या आहेत. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नैनीतालमध्ये जास्तीत जास्त 25 मृत्यू झाले आहेत.

अनेक राज्यांतील पर्यटक अडकले

मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. नदीच्या प्रवाहामुळे अनेक भागात पूल तुटले आहेत. यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटक अडकून पडले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दल तैनात करण्यात आले आहे.  उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या प्रकोपामुळे चारधाम यात्रेसाठी नाशिकमधून गेलेले जवळपास दोनशे भाविक अडकलेत. यापैकी नैनिताल परिसरातील 27 जण आपत्कालीन विभागाच्या जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. काही पर्यटक खाजगी गाड्या करून तर काही पर्यटन व्यावसायिकांकडून गेल्याने त्यांचा आकडा मिळणं अवघड बनलेय. 

नैनीतालमध्ये मुसळधार पावसामुळे आक्रोश

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नैनीतालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, यामुळे या पर्यटनस्थळाचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये सांगितले की ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. धामी यांनी आश्वासन दिले की राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराची तीन हेलिकॉप्टर लवकरच येतील. यापैकी दोन हेलिकॉप्टर नैनीतालला पाठवण्यात येतील, जिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाईची घोषणा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्तांना भरपाई जाहीर केली आहे. उधम सिंह नगरमधील पूरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्यातील आपत्तीमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि ज्यांची घरे तुटलेली आहेत त्यांना 1 लाख 9 हजार रुपये दिले जातील. ज्यांना जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत केली जाईल.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बाजपूर, रामनगर, किच्छा आणि सितारगंज येथील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करून पुराचा आढावा घेतला. या वेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धनसिंह रावत आणि राज्याचे डीजीपी अशोक कुमारही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

चारधाम यात्रींना आवाहन

मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे आकलन करून त्यांना लवकरात लवकर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांना घाबरू नका असे आवाहन करताना ते म्हणाले की त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यांनी पुन्हा चारधाम यात्रेकरूंना आवाहन केले की ते जिथे आहेत तिथेच राहा आणि हवामान सुधारण्यापूर्वी प्रवास सुरू करू नका. त्यांनी चामोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चारधाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.