Pune CCTV Leopard Attacks Pet Dog: लोकसंख्या वाढल्याने मानवी वस्ती अगदी जंगलांच्या सीमांपर्यंत वाढली आहे. मात्र यामुळे मानव आणि जंगली प्राण्यांच्या संघर्षामध्ये वाढ होताना दिसत आहे. अर्थात या संघर्षाचा तोटा मानवाबरोबर प्राण्यांनाही होत आहे. अनेकदा जंगली जानावरे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतात आणि त्यानंतर संघर्ष झाल्याचं पहायला मिळतं. मागील काही वर्षांपासून असा संघर्षाच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अनेक ठिकाणी तर हिंसक जंगली प्राण्यांची दहशत इतकी आहे की सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये अनेकदा हे प्राणी मानवी वस्तीत फिरताना दिसतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील हिंजवडीजवळच्या नेरे गावातील शिंदे वस्तीमधील आहे. येथील नेरे गावामध्ये हा सारा प्रकार घडला. कान्हे येथील महिंद्रा स्पेअर्स कंपनीजवळून हा बिबट्या रस्त्यावरुन पळत असल्याचं एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची चर्चा मागील अनेक आठवड्यांपासून होती. बिबट्याची दहशत असल्याने रात्रीच्यावेळी या ठिकाणी कोणी एकटं बाहेर पडत नाही. मात्र आता या भागातील पाळीव प्राणीही सुरक्षित नसल्याचं नुकत्याच घडलेल्या घटनेमधून दिसून येत आहे.
Leopard at Mahindra Spares Business Unit,Kanhe,Pune.
@anandmahindra pic.twitter.com/JQ01z4PVEb
— Er Sushant Dilip Balgude (@BalgudeSushant) January 7, 2023
व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला घराच्या दाराशी बांधल्याचं दिसत असून हा कुत्रा झोपलेला असतानाच एक बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो. गळ्यातील पट्टा साखळीने बांधलेला असल्याने कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत असला तरी त्याला बिबट्यापासून दूर पळता येत नाही. कुत्रा तरीही धडपड करुन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र बिबट्यासमोर त्याचा निभाव लागत नाही. बिबट्या ताकदीच्या जोरावर या कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा तोडून त्याला घरासमोरुन घेऊन जातो. संभाजी बबन जाधव यांच्या घरासमोर हा सारा प्रकार घडला. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज थ्री येथून जवळच आहे.
Disturbing Visuals: A stray leopard entered the Hinjewadi InfoTech Park area again causing panic among local residents on Tuesday night. #pune #hinjewadi #leopard #dog #attack #cctv #viralvideo pic.twitter.com/9AflvFx9H6
— Fortune Post Media (@fortune_post) March 16, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वनविभागाने आता तरी या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याला पकडावं अशी स्थानिकांची मागणी जोर धरु लागली आहे.