नाशिक: महानगरपालिकेने शहरात लागू केलेल्या करवाढीवरून लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलाय. पत्रकार परिषद घेऊन तुकाराम मुंढे यांनी लोकप्रतिनिधींना आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
करवाढीच्या मुद्द्यावर नाशिक मनपाच्या सभागृहात दहा तास चर्चा झाली. मात्र, यामध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने नाशिककरांवर करवाढीची टांगती तलवार अजूनही आहेच. महासभेत महापौरांनी करवाढ मागे घेण्याचे आदेश दिले. तर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय बेकायदेशीर असल्याची तोफ डागली. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढे यांना हटवण्यासाठी सरसावले आहेत.
मात्र, एकीकडे आयुक्तांविरोधात सर्वपक्षीय एकजूट होतेय असं दिसत असलं तरी ते वरवरचं चित्र आहे. करवाढीबाबत भाजप नौटंकी करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातल्या संघर्षात करवाढीचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून अडला आहे. संघर्षामुळे ठोस पर्यायही निघत नाही त्यामुळे नागरिक मात्र संभ्रमात आहेत.