दुसऱ्या कसोटीत टीम इंडियापेक्षाही पुणेकरांचे अधिक हाल! पाण्यासाठी घोषणाबाजी, दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स अन्...

India vs New Zealand 2nd Test MCA Pune Fans: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात असतानाच पुणेकर चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2024, 11:28 AM IST
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियापेक्षाही पुणेकरांचे अधिक हाल! पाण्यासाठी घोषणाबाजी, दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स अन्... title=
अनेकांनी व्यक्त केला संताप

India vs New Zealand 2nd Test MCA Pune Fans: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील दुसरा सामना सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जात आहे. मागील आठवड्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा पाहुण्यांनी 8 विकेट्सने पराभव केला. 2021 नंतर पहिल्यांदाच भारत मायदेशातील मालिकेमध्ये अशाप्रकारे पिछाडीवर पडला आहे. मात्र पुण्यातील कसोटीमध्ये मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरुन उत्तम खेळ करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. हा सामना भारतीय संघाला मालिका राखण्यासाठी करो या मरो पद्धतीचा असल्याने रंजक होणार असल्याच्या अपक्षेने चाहत्यांनी पुण्यातील मैदानात पहिल्याच दिवीशी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र या चाहत्यांना उन्हाचा त्रास तर सहन करावाचा लागला मात्र त्यांना पिण्याचं पाणीही मिळणं कठीण झालं. त्यामुळे पुणेकर प्रेक्षकांनी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनविरुद्ध राग व्यक्त केला.

जोरदार घोषणाबाजी

सोशल मीडियावरील अनेक पोस्टनुसार, सामन्यादरम्यान एमसीएच्या मैदानामध्ये कडक उन्हात चाहत्यांना पिण्याचं पाणीही मिळत नव्हतं. सामन्यामध्ये ब्रेक झाला तेव्हा अनेक पुणेकर चाहत्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनविरुद्ध घोषणाबाजी केली. "एमसीए हमे पानी दो, एमसीए हाय हाय..." अशी घोषणाबाजी चाहत्यांनी केली. अनेकजण गेटजवळ उभे राहून या घोषणा देत होते. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आल्या. 

सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ...

पुण्यासारख्या शहरामध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना ठेऊन ज्या प्रेक्षकांच्या जीवावर भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ झालं त्यांनाच चाहत्यांचा विसर पडावा यावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला. चाहत्यांनी एमसीएबरोबरच बीसीसीआयविरोधातही घोषणाबाजी केली. पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत सुविधांसाठी चाहत्यांना घोषणाबाजी करावी लागतेय हे लज्जास्पद आहे. 

दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स

"मैदानातील खुर्च्यांवर छप्पर नसणे, दुर्गंधीयुक्त टॉयलेट, पिण्याचं पाणी नाही, जास्त किंमत मोजूनही दर्जाहीन अन्नपदार्थ, सहकार्य न करणारे पोलीस... अशी सारी परिस्थिती असतानाही लोक मैदानात जाऊन सामने पाहतात यावरुनच त्यांचं या खेळावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्यांना अधिक चांगल्या सुविधा नक्कीच मिळाल्या पाहिजे," असं एकाने एक्सवरुन आपलं मत मांडताना म्हटलं आहे. 

भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं 259 धावांवर रोखलं. भारतीय गोलंदाजांची टीचून गोलंदाजी करुन पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाला तंबूत धाडण्यात यश मिळवलं. पहिल्या डावामध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची कामगिरी फारच सुमार झाली. भारतीय संघ लंचच्या आधीच 36 ओव्हरमध्ये 104 वर सात गडी बाद अशा अवस्थेत पोहोचला. मात्र भारतीय संघांपेक्षा मैदानात आलेल्या चाहत्यांची अवस्था अधिक दयनीय असल्याचा टोलाही काही चाहत्यांनी येथील सुविधांवरुन लागवला आहे.