जिंदगी मिली दोबारा! तब्बल 400 तासांनंतर 41 कामगारांना मिळालं नवं आयुष्य

Uttarakhand Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीतल्या सिलक्याला बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तब्बल सतरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्व कामगार आपल्या कुटुंबियांना भेटू शकले. 

| Nov 28, 2023, 21:38 PM IST
1/7

17 दिवस, 400 हून अधिक तास आणि 41 कामगार. उत्तरकाशीतल्या सिलक्याला बोगद्यात कामगार अडकले आणि संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला तब्बल १७ दिवसांनी मोठं यश मिळालंय.. उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

2/7

बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर नवं आयुष्य मिळाल्याचा आनंद स्पष्ट जाणवत होता. कामगारांचं हार घालून स्वागत करण्यात आलं.  बोगद्यातून बाहेर आलेल्या पहिल्या कामगाराचं नाव विजय होतं. विजय बाहेर येताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. 

3/7

आपल्या माणसाला पाहताच बोगद्याच्या बाहेर उभ्या असलेल्या कामगारांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.  बोगद्याच्या बाहेर अॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कामगारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यता आलं. 

4/7

एनडीआरएफच्या जवानांनी दोन तासांच्या अंतरात पाईपच्या माध्यमातून एक-एक करत सर्व कामगारांना बाहेर काढलं. सर्व कामगारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

5/7

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय मंत्री वीके सिंह यांनी सर्व कामगारांचं स्वागत केलं. कामगारांना मिठी मारत त्यांनी कामगारांच्या धैर्याचं कौतुक केलं. 

6/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अभिनंदन केलं. उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारं आहे असं पीएम मोदी यांनी म्हटलंय. बोगद्यात अडकलेल्या माझ्या मित्रांचं धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मी तुम्हा सर्वांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो असं पीएम मोदी यांनी म्हटलंय.

7/7

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बचाव कार्य यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय., "सिल्क्यरा बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मला आनंद झाला आहे.' असं गडकरींनी म्हटलं आहे.