गडकिल्ल्यांना नखही लागू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Sep 6, 2019, 10:51 PM IST
गडकिल्ल्यांना नखही लागू देणार नाही- देवेंद्र फडणवीस title=

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पर्यटन मंत्रालयाने राज्यातील २५ किल्ले लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तामुळे शुक्रवारी चांगलाच गदारोळ झाला. यावरून अनेकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. 

यावेळी फडणवीस यांनी म्हटले की, ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांसादर्भात कोणत्याही गोष्टींची परवानगी शासनाने दिलेली नाही. ज्या किल्ल्यांना कोणताच इतिहास नाही. ज्यांच्या केवळ चार भिंतीच उरल्या आहेत. अशा किल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा किल्ल्यांवरही लग्न किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

माध्यमांतून प्रसारित झालेल्या बातम्या अतिशय चुकीच्या आहेत. याबद्दल स्वतः पर्यटनमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारे विकासकामे केली आहेत. यापूर्वी कुठल्याही सरकारने अशाप्रकारे कामे केलेली नाहीत, त्याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. यासाठी छत्रपती संभाजी राजेंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी स्वतः लक्ष घातल्याने आज त्याठिकाणी चांगल्याप्रकारे कामे सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.