पुण्यात टोळीयुद्ध, जनता वसाहतीमध्ये एकाचा मृत्यू

नीलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.

Updated: Jan 14, 2019, 11:12 AM IST
पुण्यात टोळीयुद्ध, जनता वसाहतीमध्ये एकाचा मृत्यू title=

पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे सध्या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायम चर्चेत येऊ लागले आहे. दुचाकींची जाळपोळ, हत्या, खंडणीची, बलात्कार प्रकरणे यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था कायमच वेठीस धरली जाते आहे.  पुण्यात रविवारी रात्री वर्चस्व वादातून भडकलेल्या टोळीयुद्धात एकाचा खून झाल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली आहे. 

नीलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुण्यातील जनता वसाहतीत रविवारी संध्याकाळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. त्यावेळी नीलेशवर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्याच्यासोबतत असलेल्या साथीदारांवरही यावेळी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्याचे दोन्ही साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. नीलेश वाडकर याच्यावर पुण्यातील पोलिस ठाण्यात याआधी गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी अटकही केली होती. पण काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. जनता वसाहत भागात चॉकलेट सुन्या या टोपण नावाने परिचित असलेल्या तरुणाशी नीलेशचे आधीपासून भांडण होते. चॉकलेट सुन्या हा सुद्धा तडीपार गुंड आहे. रविवारी संध्याकाळी चॉकलेट सुन्या आणि नीलेश वाडकर या दोन्ही टोळ्यांमध्ये जनता वसाहत भागात तुफान हाणामारी झाली. त्यात नीलेश मारला गेला. या घटनेनंतर जनता वसाहत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.