Pune PMPML Bus Service News In Marathi : पुणे महानगर परिवहन महामंडळातून (PMPML) प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुणे मार्गावर रातराणीची बससेवा सुरु करण्यात आल्यापासून या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास 27 लाख प्रवाशांनी रात्रीच्या बससेवेचा लाभ घेतला आहे. ही बससेवा कात्रज ते शिवाजीनगर आणि कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावर सुरु असून या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. ही बस पुण्यातील पाच मार्गावर सुरु करण्यात आली असून या बसच्या वेळा तुम्हाला माहितीय का?
दरम्यान रेल्वे, एसटी, खासगी ट्रॅव्हल्ससह राज्यातील विविध जिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासासंदर्भात अनेत तक्रारी होत्या. जसे की, रात्रीच्या वेळेत रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर जादा भाडे आकारतात. प्रत्येकाला जादा भाडे परवडतील असे नाही, असा प्रवाशांसाठी पीएमपीकडून शहरातील प्रमुख पाच मार्गांवर रात्रीची रातराणी बससेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सध्या प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेल्या पाच मार्गांवर रात्रीच्या बसेस चालवतात. या बस साधारण एक ते दीड तासाने मार्गावर धावत आहे. प्रत्येक मार्गावर साधारण बसच्या आठ फेऱ्या आहेत.
पुण्याची रातराणी कात्रज-शिवाजीनगर-कात्रज, कात्रज-पुणे स्टेशन-कात्रज, हडपसर-स्वारगेट-हडपसर, हडपसर-पुणे स्टेशन-हडपसर, पुणे स्टेशन-एनडीए गेट-पुणे स्टेशन या पाच मार्गांवरच बसेस धावतात. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा दिली जात असल्याने याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून पीएमपीला दरमहा सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पादन होते. दरम्यान, बसचालकांनीही बसथांब्यावर उभे राहून प्रवाशांना बोलवावे, अशी सूचना पीएमपीकडून करण्यात आली आहे.
- कात्रज ते वाकडेवाडी स्टेशन (शिवाजीनगर) - 10.40, मध्यरात्री 12.15, पहाटे 2.20, 3.55 आणि 5.20 वाजता
- वाकडेवाडी स्टेशन (शिवाजीनगर) ते कात्रज - 11.30, मध्यरात्री 1, सकाळी 3.10, 4.40 वाजता
- कात्रज ते पुणे स्टेशन - 11, मध्यरात्री 12.30, पहाटे 2, 3.25 आणि 5 वाजता
- पुणे स्टेशन ते कात्रज - 11.50, मध्यरात्री 1.20, 2.40, सकाळी 4.10 वाजता
- हडपसर ते स्वारगेट - 10.50, 11.40, मध्यरात्री 1, पहाटे 3.45 आणि 5 वाजता
- स्वारगेट ते हडपसर - मध्यरात्री 11.50, 12.20, सकाळी 1.40, 4.15 वाजता
- हडपसर ते पुणे स्टेशन - 10.40, मध्यरात्री 12, सकाळी 2.50, 4.05 आणि 5.15 वाजता
- पुणे स्टेशन ते हडपसर - 11.20, मध्यरात्री 12.40, पहाटे 3.25 आणि 4.35 वाजता
- पुणे स्टेशन ते एनडीए गेट- 10, मध्यरात्री 12.30, सकाळी 3.45, 6.15 वाजता
- एनडीए गेट ते पुणे स्टेशन - 11.15 मध्यरात्री 1.45, पहाटे 5 वाजता