जात, पंथाविषयी बोलणाऱ्यांना धडाच शिकवेन- नितीन गडकरी

जातीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. 

Updated: Feb 11, 2019, 07:31 AM IST
जात, पंथाविषयी बोलणाऱ्यांना धडाच शिकवेन- नितीन गडकरी  title=

पुणे : पिंपरी - चिंचवड येथे  पार पडलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय लक्षवेधी वक्तव्य करत पुन्हा एकदा अनेकांच्या नजरा स्वत:कडे वळवल्या आहेत. जातीयवादाचा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी आपला जातीवादास विरोध असल्याचं स्पष्ट केलं. 

'जातीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. तुमच्या येथे नेमक्या कोणकोणत्या जाती अस्तित्वात आहेत हे मला ठाऊक नाही. पण, आमच्या येथे जातीचा मुद्दाच येत नाही. कारण, जातीविषयी काहीही वक्तव्य करणाऱ्यांना चांगलाच घडा शिकवेन अशी तंबीच मी दिली आहे', असं गडकरी म्हणाले. 

समाजात जातीयवादाला स्थानच दिलं जाऊ नये ही आपली ठाम भूमिका असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं. समाज एकतेच्याच सूत्रावर एकवटला पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 'धर्म, पंथ आणि जात या साऱ्याच्या विळख्यातून समाजाला सोडवण्याची गरज आहे. समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव, गरीब श्रीमंत असा कोणत्याच प्रकारचा दुजाभाव नसला पाहिजे. शिवाय जातींमध्ये उच्च आणि मागासवर्गीय अशी कोणत्याही प्रकारची विभागणी असल्याची गरजच नाही', हा महत्त्वाचा मुद्दा मांडत त्यांनी जातीच्या मुद्दयावरुन केल्या जाणाऱ्या भेदभावाचा तीव्र शब्दांमध्ये विरोध केला. गरजू आणि गरीबांची मदत करणं हे ईश्वर सेवेहून कमी नाही असं म्हणत त्यांनी समाजसेवेचा मंत्रही उपस्थितांना दिला. 

गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्या संबोधनपर भाषणांमधून त्यांनी वेळोवेळी आपली आणि पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये आरोप, प्रत्यारोप, आपण केलेल्या कामांची आठवण करुन देणं अशीच एकंदर त्यांची भूमिका दिसत आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भूमिका आता पक्षासाठी किती फायद्याची ठरणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.