Ramayana Interesting Facts : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच तत्पूर्वी प्रभू श्रीराम, अयोध्या, मिथीलानगरी या आणि अशा अनेक गोष्टींसंदर्भातील कुतूहल दुपटीनं वाढलं आहे. जानकीपती प्रभू श्रीराम यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. रामायण या ऋषी वाल्मिकी यांच्याद्वारे रचलेल्या महाकाव्यातून साक्षात श्रीराम, राजा दशरथ यांचा काळ डोळ्यापुढं उभा राहण्यास मदत झाली. पुढे हे रामायण महाकाव्य संतमंडळी, वेद-शास्त्रांच्या माध्यमातून विविध रुपांमध्ये समोर आलं.
रामायणातील मूळ पात्र तर जवळपास सर्वांनाच ठाऊक आहेत. पण, काही पात्र अशीही आहेत ज्यांच्याविषयी सर्वांनाच फार कमी माहिती आहे. त्यातलं एक म्हणजे प्रभू श्रीराम यांची बहीण. श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आहेत असं, एका क्षणात सांगता येतं. पण, त्यांच्या बहिणीचं नाव तुम्हाला माहितीये ?
प्रभू श्रीराम यांना एक बहीण होती. सर्व भावंडांमध्ये ही बहीण सर्वात मोठी असल्याचे संदर्भ सांगितले जातात. रामायण या महाकाव्यामध्ये प्रभू राम यांच्या बहिणीचा उल्लेख फार कमी आढळतो. असे संदर्भ आहेत की, त्यांच्या बहिणीचं नाव होतं शांता. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची ही लेक. दशरथ राजानं त्यांची ही लेक दत्तक दिली होती. उपलब्ध संदर्भांनुसार राजा दशरथानं आपले मित्र आणि अंग देशाचे राजा रोमपाद यांना कोणतीही संतान नसल्यामुळं ही मुलगी दत्तक दिली होती.