Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात. कारण महान राजनीतिकार चाणक्य यांनी मानवी स्वभावाचं निरीक्षण करून मांडल्या आहेत. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितेल्या प्रत्येक गोष्टी बारकाईने वाचल्या जातात. आज आम्ही तुम्हाल चाणक्य नीतित व्यक्तीच्या अवगुणांबाबत काय लिहिलं आहे याची माहिती देणार आहोत. तुमचा स्वभावही असाच असेल तर वेळीच सावध होत स्वभावात सुधारणा करा. अन्यथा भविष्यात चांगलाच फटका बसू शकतो.
अहंकार- गर्वाचं घर नेहमी खाली असतं, अशी म्हण प्रचलित आहे. यावरुन व्यक्तीच्या स्वभाव अहंकारी नसावा हे अधोरेखित होतं. कारण अहंकारी व्यक्ती स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेते. अहंकारी माणूस कायम रागाच्या भरात वावरत असतो. तसेच इतरांपेक्षा कायम स्वत:ला महान समजत असतो. पण पद आणि पैसा या क्षणिक गोष्टी असून एकदा का हातून गेल्या की, माणूस पूर्णपणे संपून जातो.
लोभ- आयुष्यात सुख-सुविधा मिळवण्यासाठी आपण सगळेच पैसे कमावतो, पण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काहीच कामाचा नसतो. लोभ हा एक प्रकारचा दोष असून या मार्गाने कमावलेला पैसा टिकत नाही. चाणक्य यांच्या मते, क्षणिक सुखासाठी अशा पद्धतीने कमावलेला भविष्यात मात्र दु:खदायी ठरतो.
खोटं बोलणं- आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार खोटं बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस उघडी पडते. खोटं बोलण्याने जीवनात अनेक संकटं ओढावतात. सुरुवातीला काही फायदे होतात मात्र नंतर सर्वकाही बिघडत जातं. त्यामुळे व्यक्तींनी कायम खरं बोलावं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)