मुंबई : मकर संक्रांतीचा सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण या सणाच्या तयारीला लागलं आहे. या दिवशी सगळीच मंडळी काळ्या रंगाचे कपडे घालणं पसंत करतात. तसेच लहान मुलांना देखील काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांच कौतुकाने बोरनान देखील केलं जातं. तर मकर संक्रांत आणि काळ्या रंगाचं नेमकं काय कनेक्शन आहे?
मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणे मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. उन्हात क्रिकेट खेळतांना खेळाडू हे पांढर्या रंगाचे कपडे घालतात हे तुम्ही पाहिले असेल. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. (मकर संक्रांत शुभ की अशुभ?)
थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी असतात. म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळाचे महत्त्व अधिक आहे. तिलोदकाने स्नान करणे, तीळ वाटून अंगास लावणे, तीळ खाणे तसेच तीळ दान देणे हे पुण्यकारक मानले जाते. पुण्ण्याच्या आशेने का होईना, माणसे तीळ खातील आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील हा उद्देश त्यामागे आहे. आयुर्वेदामध्ये तीळ औषधी असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक आजारांवर औषध म्हणून तीळांचा उपयोग करण्यास सांगण्यात आले आहे.
वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद झाले असतील. वादविवाद - भांडणे झाली असतील तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन ‘ क्षमा करुया आणि विसरून जाऊया ‘ हा संदेश देण्याची प्रथा आहे. ‘ तिळगूळ घ्या आणि गोड बोला ‘ असे सांगून संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जात असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून वाढत जाणार्या दिनमानाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. खरं म्हटलं तर पतंग उडविण्याचा उत्सव हा मूळ गुजरातमध्ये होता. तेथूनच तो महाराष्ट्रात आला. मात्र पतंग उडविण्याच्यावेळी जो मांजा वापरला जातोतो नायलाॅनचा व धारदार नसावा. कारण धारदार मांज्यामुळे अनेक पक्षांचे जीव गेलेले आहेत. तसेच लोकांचे जीवही गेलेले आहेत. आकाश हे पक्षांचेही आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी अनेक गोष्टींचे दान करण्यास सांगण्यात आले आहे. आधुनिक कालात ग्रंथदान, वस्त्रदान, रक्तदान, अर्थदान, अन्नदान, जलदान, ज्ञानदान , श्रमदान करायला पाहिजे असेही श्री. सोमण यांनी स्पष्ट केले.