Shardiya Navratri 2024 : हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो. या काळात 9 दिवस उपवास करुन दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. पितृ पक्ष पंधरवडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवी पालखी किंवा डोलीत स्वार होऊन येणार आहे. पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येणे अत्यंत अशुभ मानलं जातंय.
शारदीय रात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असून ती 12 ऑक्टोबरला विजयादशमीपर्यंत असणार आहे. यावेळी विधीनुसार माता राणीचे पूजन करण्यात येणार आहे. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्तही सकाळी 6:14 ते 7:21 असणार असून घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 1 तास 6 मिनिटांचा आहे. तर दुसरीकडे अभिजीत मुहूर्त सकाळी 11:45 ते दुपारी 12:33 पर्यंत असेल.
नवरात्रीत देवीचं वाहन हे वारानुसार ठरतं. दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते. जर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली, तर दुर्गेचे आगमन बोटीने होतं अशी मान्यता आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन होतं. त्याशिवाय नवरात्रीची सुरुवात शनिवार किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते.
वैदिक ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असून देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरही पडतो. जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो, ज्यामुळे चांगले पीक येते. म्हणून देवीच हत्तीवर आगमन शुभ मानलं जातं. दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते. म्हणून हे वाहन अशुभ मानलं जातं. जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते. पण यंदा देवी देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते. ज्योतिषांच्या मते, लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)