उत्सवांचा राजा श्रावण आला! जाणून घ्या प्रत्येक सणाचं महत्त्व आणि तिथी

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो.

Updated: Jul 28, 2022, 12:44 PM IST
उत्सवांचा राजा श्रावण आला! जाणून घ्या प्रत्येक सणाचं महत्त्व आणि तिथी  title=

Shravan 2022: आषाढ महिन्यातील अमावास्य आली की श्रावण महिन्याचे वेध लागतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात बरेच सण असतात. त्याचबरोबर हा महिना सात्विक महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बहुतांश लोक या महिन्यात शाकाहार करतात. श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या दिवशी उपवास केला जातो. श्रावण महिना उद्यापासून म्हणजेच 29 जुलै 2022 पासून सुरु होत असून 27 ऑगस्टपर्यंत असणार आहे. शिवलिलामृत, गुरुचरित्र यांचं पारायण करण्यास हा महिना उत्तम मानला जातो.

श्रावण महिना आणि सण

  • 1 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: तांदूळ)
  • 1 ऑगस्ट 2022: विनायक चतुर्थी
  • 2 ऑगस्ट 2022: नागपंचमी
  • 8 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: तीळ)
  • 8 ऑगस्ट 2022: पुत्रदा एकादशी 
  • 11 ऑगस्ट 2022: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
  • 15 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: मूग)
  • 15 ऑगस्ट 2022: संकष्टी चतुर्थी
  • 18 ऑगस्ट 2022: श्रीकृष्ण जयंती
  • 19 ऑगस्ट 2022: गोपाळकाला
  • 22 ऑगस्ट 2022: श्रावणी सोमवार (शिवामूठ: जव)
  • 23 ऑगस्ट 2022:  भागवत एकादशी
  • 26 ऑगस्ट 2022: पोळा/ पिठोरी अमावास्या

श्रावणी सोमवार: श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांनी पहाटे लवकर स्नान करून भगवान शिवाचं स्मरण करून संकल्प सोडावा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. त्यानंतर शिवलिंगावर बेलची पाने, फुले, धोतरा इत्यादी अर्पण करा. धूप, दिवा आणि अगरबत्ती लावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. पूजेच्या शेवटी शिव चालीसा आणि शिव आरतीचे पठण करा.

विनायक चतुर्थी: शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करतात. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी 1 ऑगस्टला आहे. गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांचा जलाभिषेक करावा. गणपतीला चंदनाचा तिलक लावावा. वस्त्र, कुंकू, धूप, दिवा, लाल फुले, पान, सुपारी इत्यादी अर्पण करा. गणेशाला सिंदूर फार आवडतो, अशी धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना गणेशाला लाल रंगाचा सिंदूर टिळक लावावा. 

नागपंचमी: श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीकडे साजरा केला. यंदाची नागपंचमी 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे.  या दिवशी नागाची पूजा केली जाते.

पुत्रदा एकादशी: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातल्या एकादशीला पुत्रदा एकादशी संबोधलं जातं. या दिवशी एकादशीचे महात्म्य ऐकून पापातून मुक्ती मिळते, अशी समज आहे. 8 ऑगस्ट 2022 ला पुत्रदा एकादशी आहे.

रक्षाबंधन:  या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणादिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते. श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजता समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, 11 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असल्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाईल.

संकष्टी चतुर्थी: संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटावर मात करणारी चतुर्थी. संकष्टी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ 'कठीण प्रसंगातून सुटका करणे' असा होतो. या दिवशी मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गणपतीची पूजा करतो. पुराणानुसार चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. 15 ऑगस्ट 2022 संकष्टी चतुर्थी आहे.

श्रीकृष्ण जयंती: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला प्रभू श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. 18 ऑगस्ट 2022 रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे. तर महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. 

भागवत एकादशी: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते. इच्छीत पळ मिळावं यासाठी या एकादशीचं व्रत केलं जातं. 22 ऑगस्ट 2022 रोजी भागवत एकादशी आहे. याच दिवशी चौथा श्रावणी सोमवार आहे.

पोळा: श्रावण अमावास्या पोळा म्हणून साजरा केला जातो. या अमावास्येला पिठोरी अमावास्या देखील म्हटलं जातं. यंदा पोळा शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)