सिलहट : ब्रेंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या ७ विकेटच्या मदतीनं झिम्बाब्वेनं पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशचा १५१ रननं पराभव केला. मागच्या ५ वर्षातला झिम्बाब्वेचा हा पहिला विजय आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा लेग स्पिनर मावुतानं २१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर ऑफ स्पिनर सिकंदर रजानं ४१ रन देऊन ३ विकेट घेतल्या. बांगलादेशला चौथ्या दिवशी विजयासाठी ३२१ रनचं आव्हान होतं. पण टीम १६९ रनवर ऑल आऊट झाली.
पाकिस्तानला २०१३ साली हरारेमध्ये हरवल्यानंतर झिम्बाब्वेचा हा पहिलाच टेस्ट विजय आहे. घराबाहेर झिम्बाब्वेनं १७ वर्षानंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकली आहे. २००१ साली झिम्बाब्वेनं चटगांवमध्ये बांगलादेशलाच हरवलं होतं. दुसरी टेस्ट ११ नोव्हेंबरपासून ढाक्यात सुरु होईल.
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रिकनं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर भारताच्या लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. २००७ साली भारतानं धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी राजपूत भारतीय टीमचे मॅनेजर होते.
२००८ साली लालचंद राजपूत आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमचे प्रशिक्षक होते. त्यावेळी लालचंद राजपूत वादात सापडले होते. पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी मुंबईच्या हरभजन सिंगनं श्रीसंतला थप्पड मारली होती. तेव्हा लालचंद राजपूत हसत असतानाचा एक फोटो समोर आला होता.