मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरी टी-२० आज खेळवण्यात येणार आहे. ३ मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच २-०ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. या टी-२०मध्ये टीम इंडिया नव्या खेळाडूंना संधी देऊ शकते. याबाबत दुसऱ्या मॅचनंतर विराटने सांगितलं होतं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी निवड समितीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. यातल्या काहींना पहिल्या दोन टी-२० मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. पण श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि राहुल चहर यांना अजूनही संधी मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या मॅचसाठी या तिघांचा विचार होऊ शकतो.
रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या पहिल्या तीन बॅट्समनच्या क्रमामध्ये कोणताही बदल होणार नाही हे निश्चित मानलं जात आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. पण आता तिसऱ्या मॅचमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळेल, असा अंदाज आहे. तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळल. पाचव्या क्रमांकावर खेळलेल्या मनिष पांडेला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या स्पिनरनी या सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण तिसऱ्या टी-२०मध्ये जडेजाला आरम देऊन लेग स्पिनर राहुल चहरला खेळवलं जाऊ शकतं.
फास्ट बॉलिंगमध्ये नवदीप सैनीने चांगली कामगिरी केली आहे, तर भुवनेश्वर कुमारनेही त्याचा अनुभव दाखवला आहे. खलील अहमदने या सीरिजमध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे खलीलऐवजी फास्ट बॉलर दीपक चहरची निवड होऊ शकते.