मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात त्याला वगळण्यात आलं. तर जडेजाची दुखापत गंभीर असल्याने तो यंदाच्या आयपीएल सिझनमधूनही बाहेर गेला आहे. तर आता यासंदर्भात माजी क्रिकेटर आकाश चोपडाने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
रवींद्र जडेजाने अजून स्वतः दुखापत झाल्याची माहिती दिलेली नाही. शिवाय याचा उल्लेख त्याने सोशल मीडियावर किंवा कोणत्याही पत्रकार परिषदेत केलेला नाही. मात्र सीएसके आणि जडेजा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून याबाबत अनेक चर्चा होतायत.
मुंबईविरूद्धच्या सामन्यापूर्वी आकाश चोपडा म्हणाला की, जडेजा या सामन्यासाठी उपस्थित राहणार नाही. पण मला असं वाटतं की, कदाचित तो पुढच्या वर्षीही नसेल. 2021 मध्ये सुरेश रैनाच्या बाबतीतही असंच घडलं होतं. काही सामन्यानंतर तो अचानक सगळं सोडून गेला."
जाडेजाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना शरीराच्या वरच्या भागाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जाडेजाला दिल्ली विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, जाडेजाला या मोसमातून बाहेर पडावं लागू शकतं.
जाडेजाला या मोसमाच्या सुरुवातीला चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी मिळाली. मात्र जाडेजाला धोनीच्या कॅप्ट्न्सीचा वारसा यशस्वीपणे पुढे नेता आला नाही. चेन्नईने या मोसमात जाडेजाच्या नेतृत्वात 8 सामने खेळले. या 8 पैकी फक्त 2 सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला. कॅप्टन्सीमध्ये अपयशी ठरल्यानंतर जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता पुन्हा धोनीकडे जबाबदारी देण्यात आली.