नवी दिल्ली : बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यामधले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता आयपीएल फायनलदरम्यान ट्रॉफी सोपवण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांना आयपीएल विजेत्या टीमला ट्रॉफी द्यायची होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली वनडेवेळी कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी पुरस्कार न देऊन प्रोटोकॉलचा अनादर केला होता. त्यामुळे आयपीएल फायनलवेळी मला ट्रॉफी द्यायची होती, पण प्रशासकीय समितीमधले माझे सहकारी लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांनी नकार दिल्याचं, डायना एडुल्जी यांनी सांगितलं.
आयपीएलची ट्रॉफी सीके खन्ना यांनीच मुंबईच्या टीमला दिली. पण आयपीएल ट्रॉफी देणं आपल्यासाठी महत्त्वाचं का होतं? याचं स्पष्टीकरण एडुल्जींनी दिलं नाही.
या सगळ्या वादावर डायना एडुल्जी यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं. यामध्ये त्या म्हणाल्या, 'प्रशासकीय समितीची ८ एप्रिलला बैठक झाली, या बैठकीत याबद्दल चर्चा झाली. सीके खन्ना यांनी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी ट्रॉफी दिली नाही. त्यावेळी सीके खन्ना यांनी प्रोटोकॉलचा अनादर करून दिल्लीच्या राज्य संघाच्या पदाधिकाऱ्याला ट्रॉफी द्यायला सांगितलं. त्यामुळे आयपीएल फायनलमध्येही प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी ट्रॉफी द्यायला पाहिजे. कार्यकारी अध्यक्षांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा अपमान केला होता.'
'प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय फायनलला आले असते, तर त्यांनी विजेत्या टीमला ट्रॉफी द्यायला पाहिजे होती. अन्यथा मी आणि लेफ्टनंट जनरल थोडगे यांनी मिळून ट्रॉफी द्यायला पाहिजे.'
सीके खन्ना यांनी बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांना २ वर्ष जुना मेल दाखवल्यामुळे राग आला. २०१७ सालच्या या मेलमध्ये प्रोटोकॉलनुसार बीसीसीआय अध्यक्ष विजेत्या टीमला ट्रॉफी सोपवतो.
याच मेलचा दाखला देत डायना एडुल्जी यांनी दिल्लीतल्या मॅचवेळी अध्यक्षांनी ट्रॉफी का दिली नाही, असा सवाल विचारला. याचं उत्तर अजूनही सीके खन्नांनी दिलेलं नसल्याचा दावा एडुल्जींनी केला आहे.
डायना एडुल्जी यांनी अमिताभ चौधरी यांच्यावरही आरोप केला आहे. फायनलच्या दिवशी त्यांना फक्त ट्रॉफी देण्यातच स्वारस्य होतं. त्यामुळे त्यांनी २०१७ सालचा मेल आपल्या खिशात ठेवला होता, असं एडुल्जी म्हणाल्या. ट्रॉफी देण्यापासून रोखण्यात बीसीसीआयच्या काही लोकांची पडद्यामागची भूमिका असल्याचा आरोप एडुल्जींनी केला.