Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 31, 2023, 07:02 PM IST
Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर title=

IND vs PAK, Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ जवळपास 10 महिन्यांनी आमने सामने येणार आहे. एशिया कप स्पर्धेत  भारत आणि पाकिस्तान येत्या 2 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. श्रीलंकेतल्या कँडी शहरातील पल्लेकल स्टेडिअमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा महामुकाबला सुरु होईल. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) याआधी 23 ऑक्टोबर 2022 रोजी टी20 वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला चार विकेटने धूळ चारली होती. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीसाठी विराट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 

अशी असेल टीम इंडियाचा Playing XI
आता जवळपास वर्षभरानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा आमने सामने येणार आहेत. एशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान 13 सामने खेळले गेले असून यातल्या 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता एशिया कप 2023 स्पर्धेतही पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा तगडी प्लेईंग इलेव्हन (Playing XI) घेऊन मैदानात उतरेल. 

सलामीची जबाबादारी
पाकिस्तानविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत कर्णधार रोहित शर्माबरोबर युवा फलंदाज शुभमन गिल सलामीला येईल. या दोघांची जोडी सध्या चांगली जमली आहे. पहिल्या दहा षटकात आक्रमक धावा करण्याची क्षमता या जोडीत आहे. 

मधल्या फळीची मदार
भारतीय फलंदाजीत विराट कोहलीचा तीसरा क्रमांक निश्चित आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त के एल राहुल एशिया कपमधल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. अशात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशनची वर्णी लागू शकते. इशान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो. तर सूर्यकुमार यादवला या सामन्यात बाहेर बसावं लागू शकतं. 

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांडया सहव्या क्रमांकवर तर रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. 

फिरकी गोलंदाजी
फिरकी गोलंदाजी बरोबरच तळाला फलंदाजीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अक्षर पटेलला आठव्या क्रमांकावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला मैदानाबाहेर बसावं लागेल.

वेगवान गोलंदाज
वेगवागन गोलंदाजीची मदार मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटावर असेल. दुखापतग्रस्त बुमराह परतल्याने टीम इंडियाची ताकद वाढली आहे. तर डेथ ओव्हरमध्ये सिराजहीने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केलं आहे. 

भारताचा संभाव्य  Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.