आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताने नेपाळचा (Nepal) पराभव केला आहे. यासह भारत 'सुपर फोर' फेरीसाठी पात्र ठरला आहे. सामन्यात सतत पावसाचा व्यत्यय असताना भारतीय संघाने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार नेपाळविरोधात 10 गडी राखत विजय नोंदवला. या विजयासह भारताने सुपऱ फोर फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान, या सामन्यात फलंदाजीला न येताही विराट कोहली मात्र चर्चेत होता. याचं कारण नेपाळच्या एका क्रिकेटरने केलं ट्विट होतं.
सामना संपल्यानंतर नेपाळचा क्रिकेटर सोमपाल कामी याने विराट कोहलीची भेट घेतली. यावेळी त्याने शूजवर विराट कोहलीची स्वाक्षरी घेतली. सोमपाल कामीने स्वाक्षरी घेतानाचा आणि केल्यानंतर असे फोटो इंस्टाग्रामला शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने 'विराट कोहली फक्त क्रिकेटर नाही, तर भावना आहेत,' असं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
सोमपाल कामीच्या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया नोंदवली असून विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. सोमपाल कामी हा नेपाळचा अष्टपैलू खेळाडू आहे. भारताविरोधातील सामन्यात त्याने 48 धावा केल्या. 56 चेंडूत केलेल्या या धावांमध्ये त्याने 1 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. मोहम्मद शामीने सोमपाल कामीला बाल केलं. दरम्यान, गोलंदाजीत मात्र सोमपाल खास कमाल करु शकला नाही.
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकांत 230 धावा केल्या होत्या. पण नंतर पावसाचा व्यत्यय आला. यामळे खेळ थांबवण्यात आला होता. खेळ सुरु झाल्यानंतर भारतासमोर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 23 षटकांत 145 धावा धावांचं लक्ष्य देण्यात आलं. हे आव्हान भारताने 20.1 षटकांत 147 धावा करत पूर्ण केलं. भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक खेळी केली. रोहित शर्माने 59 चेंडूत 74 आणि शुभमन गिलने 62 चेंडूत 67 धावा ठोकल्या.
भारताने फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा पावसामुळे खेळ थांबला होता. भारताने 2.1 षटकांत 17 धावा केल्या असतानाच पावसाने व्यत्यय आणला. दरम्यान डाव पुन्हा सुरु झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी लय कायम ठेवली आणि आक्रमक खेळ केला. रोहितने 74 धावा करताना 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तर शुभमनने 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला.