Asian Games 2023 Chinese Player: चीनमध्ये सध्या सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) भारताने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या आठवड्या दिवसापर्यंत भारताने एक डझनहून अधिक सुवर्णपदकांवर नाव कोरलं आहे. रविवारी आशियाई खेळ स्पर्धेचं यजमानपद असलेल्या चीनच्या एका महिला खेळाडूने शर्यत सुरु होण्याआधी केलेल्या अती शहाणपणाचा फटका तिला बसला आहे. या महिला खेळाडूची फसवेगिरी जगासमोर आली आहे. यानंतर या खेळाडूवर कारवाई करण्यात आली असून त्याचा फायदा भारताच्या ज्योति याराजीला झाला आहे.
चीनमधील आशियाई खेळांच्या आठव्या दिवशी भारतासाठी 52 वं पदक ज्योति याराजीने (Jyothi Yarraji) जिंकलं. 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये ज्योतिने कांस्यपदकावर नाव कोरलं. चिनी महिला खेळाडूने या शर्यतीच्या सुरुवातीलाच खोटारडेपणा केला. यासंदर्भातील तक्रार भारतीय अधिकाऱ्यांनी आयोजकांकडे केली. ज्योतिबरोबर धावणाऱ्या चिनी महिला खेळाडूने ज्या पद्धतीने सुरुवात केली ती नियमांना धरुन नसल्याचं म्हटलं. तसेच या प्रकरणामध्ये चौकशी करावी आणि ही खेळाडू दोषी असली तर तिच्यावर कारवाई करावी असंही म्हटलं.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करुन कारवाईही करण्याचा निर्णय घेतला. चौकशीमध्ये चिनी खेळाडू यन्नू वू (Yanni Wu) 100 मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्याप्रकरणी दोषी आढळून आली. कोणत्याही धावण्याच्या शर्यतीची सुरुवात करताना ज्या ठराविक पद्धतीने खेळाडूंनी स्टार्टींग लाइनवरुन सुरुवात करायची असते त्यापेक्षा वेगळ्या शैलीमध्ये यन्नू वू हिने शर्यतीला सुरुवात केली. शर्यत सुरु झाल्याचा इशारा होताच यन्नू वू ने धावण्यास सुरुवात केली. ती ज्या पद्धतीने सार्टींग लाइनजवळ पोझिशन घेऊन बसली होती त्याचा तिला फायदा झाला आणि ती इतरांपेक्षा पुढे निघून गेली. पंचांनी या शर्यतीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर यन्नू वू ने केलेली फसवेगिरी समोर आली.
पदक जिंकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केल्याप्रकरणी यन्नू वूला डिक्वॉलिफाय म्हणजेच बाद करण्यात आलं. याचा फायला ज्योतिला झाला. तिला कांस्य पदकाऐवजी रौप्य पदक प्रदान करण्यात आलं. यामुळे भारताच्या खात्यात आणखीन एका रौप्य पदकाची भर पडली.
आठव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चीनमधील हांझोउमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेमध्ये भारताने 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 18 कांस्य अशी एकूण 52 पदकं जिंकली आहेत. रविवारी म्हणजेच 1 ऑक्टोबरला शॉट पूट (गोळा फेक) स्पर्धेमध्ये तेजिंदर पाल सिंग तूर आणि अविनाश साबळेने 3000 मीटर स्पीपलचेज स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.