World Cup 2023 : एशिया कपनंतर आता सर्व चाहत्यांचं लक्ष वर्ल्डकपच्या ट्रॉफीकडे आहे. येत्या 5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकपला सुरुवात होणर आहे. पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. सध्याच्या परिस्थितीला वॉर्म अप सामने सुरु असून यामधील काही सामने पावसामुळे रद्द झाले. अशामध्ये आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, वर्ल्डकप सुरु झाल्यानंतर पाऊस पडल्यास काय होणार?
नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2023 च्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ झाला. दरम्यान याचा परिणाम अनेक सामन्यांच्या खेळावर झाला आणि सामने रद्द झाले. हे लक्षात घेऊन आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांमध्ये पावसाशी संबंधित काही नवीन नियम केले आहेत.
ICC ने वर्ल्डकप 2023 च्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. यावेळी जर वर्ल्डकप 2023 चा उपांत्य फेरीचा सामना किंवा अंतिम सामना पावसामुळे नियोजित तारखेला खेळला गेला नाही, तर आयसीसीने ते सामने दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. यापूर्वी एशिया कप 2023 च्या फायनल सामन्यामध्ये आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला होता.
वर्ल्डकप 2023 संदर्भात आयसीसीने जारी केलेल्या नियमांनुसार, जर वर्ल्डकप 2023 च्या लीग स्टेजमधील कोणताही सामना पावसामुळे रद्द झाला, तर अशा परिस्थितीत दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1 गुण मिळतील. लीग स्टेजमधील कोणत्याही सामन्यासाठी आयसीसीने कोणताही रिझर्व्ह डे ठेवलेला नाही.
जर एखाद्या सामन्यामध्ये पावसाचा खेळ झाला तर त्या सामन्याचा कोणताही निकाल मिळविण्यासाठी दोन्ही टीम्सना त्यांच्या डावामध्ये 20 ओव्हर्सची फलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतरच त्या सामन्याचा निकाल DLS पद्धतीने देता येणार आहे. पावसामुळे कोणत्याही सामन्यात दोन्ही टीम्सने प्रत्येकी 20-20 ओव्हरची फलंदाजी न केल्यास तो सामना रद्द केला जाईल. अशावेळी दोन्ही टीम्सना 1-1 गुण देण्यात येईल.