भारतात कोरोना पसरलाय म्हणून टीम ऑस्ट्रेलियाला एवढं वाईट उत्तर... पाहा काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

कोरोनाची परिस्थिता पाहाता अनेक भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

Updated: Apr 27, 2021, 05:53 PM IST
भारतात कोरोना पसरलाय म्हणून टीम ऑस्ट्रेलियाला एवढं वाईट उत्तर... पाहा काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन title=

मुंबई : भारतात सध्या IPLचे वारे वाहात आहे. कोरोना काळात लोकांन घर बसल्या विरंगुळा देणारे हे साधन आहे. IPLमध्ये बरेच असे खेळाडू आहेत, जे बाहेरील देशामधून खेळायला आले आहेत. परंतु भारतातील कोरोनाची परिस्थिता पाहाता अनेक भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रेलियन देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे वक्तव्य.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारे खेळाडू खासगीरित्या भारत दौर्‍यावर आले आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या देशाकडे परत येण्यासाठी स्वतःची व्यवस्था  स्वत:च करावी असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले आहे.

मॉरिसन यांनी गार्डियनसोबत बोलताना सांगितले की, "खेळाडू खासगीरित्या भारत दौर्‍यावर आले आहेत, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचा याच्याशी संबंध नाही. ते त्यांच्या स्वतःच्या खासगी कामासाठी आले आहेत. मला खात्री आहे की ते त्यांच्या स्वत: ची व्यवस्था करुन ऑस्ट्रेलियात परत येतील."

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसनने भारताकडून येणाऱ्या थेट विमानसेवा - व्यापारी आणि सरकारच्या स्वदेशी सेवा यांना 15 मे पर्यंत बंदी घातली होती

यामुळे राजस्थान रॉयल्स (RR) चे अँड्र्यू टाय आणि रॉयल चॅलेंजर्स बँग्लेरचा (RCB) केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम जाम्पा यांनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फलंदाज ख्रिस लिन म्हणाला की, त्याने आयपीएलच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटला खेळाडूंना आपल्या देशात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था करण्यास सांगितले होते.

"मी त्यांना मॅसेज केला की, जर आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आमच्या प्रत्येक आयपीएल कराराचा दहा टक्के हिस्सा दिला तर, आम्हाला यावर्षी मॅच संपल्यानंतर चार्टर्ड फ्लाइट्सने देशात परत येण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे का?" असे लिनने माध्यमांना सांगितले.

या परिस्थितीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी सांगितले की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सहभागी खेळाडूंना मॅच संपल्यानंतर मायदेशी परत पाठवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. भारतात कोविड19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर बीसीसीआयने हे विधान केले आहे.

बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी खेळाडूंना एक पत्र लिहले त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, "आम्हाला माहिती आहे की, तुमच्यातील बरेचजण स्पर्धा संपल्यानंतर घरी परत कसे जाणार याबद्दल भीती बाळगत आहे. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या मायदेशी परत जाल आणि यासाठी बीसीसीआय आपल्या वतीने सर्व प्रयत्न करेल. मॅच संपल्यानंतर आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी बीसीसीआय सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत."