लंडन : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केलं आहे.
मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी बॉल छेडछाड प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली. ही शिक्षा संपल्यानंतर स्मिथ आयपीएलमध्ये खेळताना दिसला. यानंतर इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर झालेल्या सराव सामन्यात स्मिथने बॉलरची धुलाई केली.
पॅट कमिन्सला थर्ड मॅनच्या डोक्यावरून सिक्स मारल्यानंतर स्मिथने नॅथन कुल्टर नाईलवरही हल्ला चढवला. स्मिथची ही बॅटिंग बघणं म्हणजे सचिनला बॅटिंग करताना बघितल्यासारखं होतं, असं लँगर म्हणाले.
'एक बॅट्समन म्हणून हे चांगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यान मी स्मिथला बॅटिंग करताना बघितलं. तो या खेळाचा मास्टर आहे. त्याने टीममध्ये चांगलं पुनरागमन केलं आहे,' अशी प्रतिक्रिया लँगरनी दिली.