close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार, या टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता

भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याबाबत गंभीर विचार करत आहे.

Updated: May 19, 2019, 11:00 PM IST
युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार, या टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता

मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याबाबत गंभीर विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जगभरातल्या टी-२० लीगमध्ये युवराज सिंग खेळताना दिसू शकतो. बीसीसीआयकडून टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली, तरच युवराज निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेईल. भारताकडून खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे युवराज निवृत्तीच्या विचारापर्यंत पोहोचला आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. युवराज सिंगला जीटी-२० (कॅनडा), आयर्लंडमध्ये युरो टी-२० स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्याच्या ऑफर आहेत. याबद्दल युवराजला बीसीसीआयशी बोलायचं आहे.'

भारताचा ऑलराऊंडर इरफान पठाणने कॅरेबियन प्रिमियर लीगच्या ड्राफ्टमध्ये आपलं नाव दिलं. पण इरफान अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला बीसीसीआयकडून परवानगी घ्यायची गरज होती. इरफानला त्याचं नाव ड्राफ्टमधून मागे घेण्यास सांगण्यात आल्याचं, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

युवराज सिंग प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होत असेल, तर नियम बघावे लागतील. युवराज प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरी बीसीसीआयच्या टी-२० मधला नोंदणीकृत खेळाडू असू शकतो, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

युवराज सिंग आयपीएलच्या या मोसमात मुंबईच्या टीममध्ये होता. मुंबईकडून युवराजला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही, त्यामुळे युवराज या निर्णयापर्यंत आल्याची शक्यता आहे.

सेहवाग आणि झहीर खान यांना दुबईतल्या टी-१० लीगमध्ये सहभागी होता येतं, मग युवराजला का नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यावर बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, 'टी-१० ला आयसीसीची परवानगी मिळाली असली, तरी अजूनही या फॉरमॅटची स्वीकार्यता नाही. भविष्यात जेव्हा खेळाडूंचा संघ आकार घेईल तेव्हा संन्यास घेतलेल्या खेळाडूंच्या मुद्द्याचा विचार केला जाईल. निवृत्त झाल्यानंतर खेळाडूंना बिग बॅश लीग, सीपीएल आणि बीपीएलमध्ये खेळायची परवानगी मिळाली पाहिजे'.