ODI World Cup, Captain Injured : शनिवारी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलं आहे. टीमचा कर्णधार दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इतकंच नाही तर कर्णधाराच्या रिप्लेसमेंटची देखील घोषणा करण्यात आली आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी शनाका सध्याच्या वनडे वर्ल्डकपमधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू चमिका करुणारत्नेचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. दासुनाच्या उजव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे शनाका शनिवारी वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर पडला. कर्णधाराच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या टीमचं टेन्शन वाढलं आहे.
32 वर्षीय शनाकाच्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड्कपला मुकणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या टीमची कामगिरी काही फारशी चांगली राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जारी केलेल्या निवेदनानुसार, 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान शनाकाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान 3 आठवडे लागणार आहे. परिणामी श्रीलंकेच्या टीम मॅनेजमेंटला दासुनाची रिप्लेसमेंट शोधावी लागली.
आयसीसी तांत्रिक समितीने शनाकाच्या जागी करुणारत्नेचा टीममध्ये समावेश करण्यास मान्यता दिलीये. दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 429 रन्सचा पाठलाग करताना दासून शनाकाने 62 बॉल्समध्ये 68 रन्सची खेळी केली. त्याच्या जागी येणारा चमिका करुणारत्नेने आतापर्यंत 23 वनडे सामने खेळले असून या फॉरमॅटमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत.
श्रीलंकेच्या टीमला वर्ल्डकपच्या स्पर्धेत आता पुढील सामना सोमवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी पाचवेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाशी खेळायचा आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आहे. आतापर्यंत श्रीलंकेच्या टीमला या स्पर्धेत एकंही विजय मिळवता आलेला नाही. वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंकेची टीम सातव्या क्रमांकावर आहे