'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

सायनाची नव्या इनिंगला सुरुवात

Updated: Jan 29, 2020, 01:10 PM IST
'फुलराणी' सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात तिच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही यावेळी भाजपात प्रवेश केला. आता सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करेल. काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

यावेळी सायना नेहवालने म्हटले की, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आज देशासाठी चांगलं काम करणाऱ्या पक्षात मी प्रवेश करत आहे. कष्ट करणारे लोक मला आवडतात. नरेंद्र मोदी देशासाठी खूप मेहनत घेतात. नरेंद्र मोदींनी क्रीडा क्षेत्रासाठी खूप काम केलं आहे. माझ्यासाठी हे सर्व काही नवे आहे. पण मला राजकारणाबद्दल वाचायला आवडते. नरेंद्र मोदींकडून मला खूप काही शिकायला मिळतं. देशासाठी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे सायनाने सांगितले.

माजी विश्वविजेती सायना नेहवाल आजही भारतीय बॅडमिंटन विश्वातील आघाडीच्या चेहऱ्यांपैकी एक आहे. हरियाणाच्या हिसार येथे १९ मार्च १९९० रोजी सायनाचा जन्म झाला होता. २३ मे २०१५ रोजी तिने बँडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सध्या ती जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

राजकारणाच्या मैदानात प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट लवकरच येत आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात 'साइना'चे चित्रीकरण पूर्ण होईल असा अंदाज आहे. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारणार आहे.