close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#ChristchurchMosqueAttack : मशिदीवरील हल्ल्यानंतर बांग्लादेशचा न्यूझीलंड दौरा रद्द

खेळावरही भीतीचं सावट 

Updated: Mar 15, 2019, 01:01 PM IST
#ChristchurchMosqueAttack  : मशिदीवरील हल्ल्यानंतर बांग्लादेशचा न्यूझीलंड दौरा रद्द

क्रिस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारानंतर या हल्ल्याचं आणि परिस्तितीचं गांभीर्य जाणत बांग्लादेश आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारे आगामी सामने रद्द करण्य़ात आल्याची माहिती मिळत आहे. सध्याच्या घडीला बांग्लादेशचा क्रिकेट संघ एका मोठ्या हल्ल्यातून बचावला असून, त्याच धर्तीवर त्यांचा न्यूझीलंड दौरा रद्द करण्यात आला आहे. शनिवारी Hagley Oval येथे बांग्लादेश आणि न्यूझीलंड या दोन्ही दोशांमधील कसोटी मालिकेला सुरुवात होणार होती. पण, आता मात्र हे चित्र पुरतं बदललं आहे. 

न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्च या भागात असणाऱ्या दोन मशिदींमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी बांग्लादेशच्या क्रिकेट संघाची बस त्याच भागात होती. संघाला सामना करावा लागणाऱ्या या परिस्थितीविषयी बांग्लादेशच्या क्रिकेट संघातील खेळाडूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. प्रत्येकाकडून आम्ही थोडक्याच वाचलो, अल्लाहमुळे वाचलो अशा प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळालं. हल्ल्याची माहिती मिळताच विविध स्तरांतून बांग्लादेशच्या क्रिकेट संघाविषयी चिंतातूर वातावरण पाहायला मिळालं होतं. 

भीती आणि चिंतेचं हे एकंदर वातावरण पाहता संघातील सर्व खेळाडू सुखरुप असून, ते सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचले असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली. शिवाय संघ व्यवस्थापक आणि बांग्लादेशचं क्रिकेट नियामक मंडळीही खेळाडूंशी सतत संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या हल्ल्यात ४० जणांचा बळी गेला आहे. माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार जवळपास वीस वेळा गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. यामध्ये आतापर्यंत ५० नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असण्याची माहिती मिळत आहे.