Indian team for U-19 World Cup : नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC Under-19 World Cup) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय 29 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारतादरम्यान होणाऱ्या तिहेरी मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबच्या उदय सहारनकडे (Uday Saharan) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशच्या सौमी पांडेकडे (Saumy Kumar Pandey) उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व करणरा उदय सहारन अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. अंडर-19 एशिया कप स्पर्धेतही उदय सहारनकडे टीम इंडियाच कर्णधारपद आहे. अंडर-19 एशिया कप स्पर्धेत नेपाळविरुद्ध सात विकेट घेणाऱ्या राज लिम्बानीलाही विश्वचषकात संधी देण्यात आली आहे. भारत अंडर-19 विश्वचषकाचा गतविजेता संघ आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणार विश्वचषक
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या पाच स्टेडिअमवर ही स्पर्धआ होईल. 19 जानेवारी 2024 पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजदरम्यान सलामीचा सामना खेळवला जाईल. 11 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगेल.
भारतीय संघाचं वेळापत्रक
भारतीय संघाचा समावेश बांगलादेश, आयर्लंड, यूएसएच्या ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. ग्रुप स्टेजमधले भारताचे तिनही सामने ब्लोमफोंटेनमध्ये खेळवले जाणार आहेत. भारताचा पहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशिवरुद्ध होईल. तर 25 जानेवारीला आयर्रंलडविरुद्ध दुसरा आणि 28 जानेवारीला यूएसएविरुद्ध तिसरा सामना खेळवला जाईल.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौमी कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी आणि नमन तिवारी.
स्पर्धेत 16 संघ
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये 16 संघांचा समावेश आहे. यामध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. तर नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलँड आणि यूएसए संघांचा क्वालिफायमधून प्रवेश झालाय.
राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश आणि किरण चोरमले