मुंबई : भारताशी जोडल्या गेलेल्या तीन मॅचच्या पिचशी कथित छेडछाड केल्याच्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. याप्रकरणी बीसीसीआयनं माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसविरुद्ध सावध प्रतिक्रिया दिली आहे. रॉबिन मॉरिस आयसीसीच्या कारवाईमध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर आम्हीही कारवाई करू असं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं आहे. अल जजीरा या चॅनलनं हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारत-श्रीलंकेमध्ये २६-२९ जुलै २०१७ साली गेल मैदानात झालेली टेस्ट, भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रांचीत १६-२० मार्च २०१७ साली झालेली टेस्ट आणि भारत-इंग्लंडमध्ये चेन्नईत १६-२० डिसेंबर २०१६ साली झालेल्या टेस्टचा समावेश आहे. गेल आणि चेन्नईत झालेल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता तर रांचीमध्ये झालेली मॅच ड्रॉ झाली होती.
रॉबिन मॉरिसनं ४२ प्रथम श्रेणई आणि ५१ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. रॉबिन मॉरिस हा सध्या बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही पदावरून हटवू शकत नाही. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना महिन्याला २२,५०० रुपये पेन्शन देतं. रॉबिन मॉरिस याप्रकरणी दोषी आढळला तर त्याची पेन्शन रद्द करू असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. रॉबिन मॉरिसनं हे सगळे आरोप फेटाळून लावले असून आपल्याविरुद्ध हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
अल जजीरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रॉबिन मॉरिस पत्रकाराला गेल मैदानाचा पिच क्युरेटर थरंगा इंडिकाची भेट घालून देतो. या भेटीमध्ये क्युरेटर थरंगा इंडिका पिचमध्ये बदल करण्याचा दावाही करतो. रॉबिन मॉरिसला या व्हिडिओमध्ये कथित स्वरुपात पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रजाबरोबर दाखवण्यात आलं आहे. हसन रजा हा सगळ्यात लहान वयात टेस्ट क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याचा संपर्क आणि मैदानातल्या कर्मचाऱ्यांबरोबर पिच फिक्स करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल सांगत आहे.
मुंबईच्या शारदाश्रम शाळेतून शिकलेला रॉबिन मॉरिस हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य होता. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मॉरिसनं ३१ व्या वर्षी क्रिकेट खेळणं सोडून दिलं. मॉरिस चांगलं क्रिकेट खेळत असताना आयपीएल असतं तर अनेक टीमनी त्याच्यावर चांगल्या पैशांची बोली लावली असती, असं मुंबई क्रिकेटशी जोडलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं आहे. मध्यमवर्गीय असलेला रॉबिन मॉरिसनं भारत पेट्रोलियमची सुरक्षित नोकरी सोडली. देशांतर्गत क्रिकेट खेळून मॉरिसला एवढे पैसे मिळाले नाहीत तरीही तो मर्सिडिज बेंझ ही गाडी चालवायचा आणि महाग घड्याळं घालायचा, असं मॉरिसच्या एका जवळच्या मित्रानं सांगितलं आहे.
मॉरिस त्याच्या जुन्या मित्रांपासून लांब गेला होता. त्याच्या लागोपाठच्या दुबई यात्रांवर संशयही घेतला जात होता, असं मॉरिससोबत दुलीप आणि देवधर ट्रॉफी खेळणारा माजी क्रिकेटपटू म्हणाला आहे. या वादानंतर मॉरिसनं त्याचा मोबाईल बंद केला आहे. एवढच नाही तर त्यानं त्याचं फेसबूक अकाऊंटही बंद केलं आहे.