म्हणून अनुष्का शर्मा विराटबरोबर आली, बीसीसीआयचं स्पष्टीकरण

लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Aug 9, 2018, 07:15 PM IST
म्हणून अनुष्का शर्मा विराटबरोबर आली, बीसीसीआयचं स्पष्टीकरण

लंडन : लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बीसीसीआयनं या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरून आता बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे.

या फोटोमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पुढच्या रांगेमध्ये उभी आहे. तर भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा आहे. यामुळे सोशल नेटवर्किंगवरून बीसीसीआयवर टीका होत आहे.

अनुष्का शर्मा भारतीय टीमची सदस्य आहे का? हा फॅमीली फोटो नाही, टीम इंडियाचा फोटो आहे. दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नी या अधिकृत दौऱ्यावर नाहीत. भारताचा उपकर्णधार शेवटच्या रांगेमध्ये आणि भारतीय क्रिकेट टीमची पहिली महिला पहिल्या रांगेमध्ये... काही दिवसांपूर्वी हीच लोकं ऑनलाईन लेक्चर देत होती... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येत आहेत.

बीसीसीआयचं स्पष्टीकरण

या सगळ्या वादावर आता बीसीसीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय उच्चायुक्तांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. परदेश दौऱ्यांमध्ये अशाच प्रकारे उच्चायुक्त खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला भोजनाला बोलावतात. यामध्ये कोणताही नियमांचा भंग झालेला नाही. भोजनाला पत्नीला घेऊन जायचं किंवा नाही हा खेळाडूचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं वक्तव्य बीसीसीआयच्या सूत्रांनी केलं आहे.

आमंत्रण गेल्यामुळेच अनुष्का शर्मा या कार्यक्रमाला आली. या सोहळ्याचं आयोजन भारतीय उच्चालयानं नाही तर भारतीय उच्चायुक्त आणि त्यांच्या पत्नीनं केलं होतं. अजिंक्य रहाणेला शेवटच्या रांगेत उभं राहायला कोणीही सांगितलं नव्हतं. तो स्वत:च तिकडे जाऊन उभा राहिला असेल, असं बीसीसीआयनं सांगितलं.