मंकडिंग वाद, अश्विनला लेक्चरची गरज नाही- बीसीसीआय

आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा कर्णधार अश्विनने जॉस बटलरला मंकडिंग करून आऊट केलं.

Updated: Mar 27, 2019, 04:34 PM IST
मंकडिंग वाद, अश्विनला लेक्चरची गरज नाही- बीसीसीआय title=

मुंबई : आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा कर्णधार अश्विनने जॉस बटलरला मंकडिंग करून आऊट केलं. अश्विनने बॉल टाकायच्या आधीच नॉन स्ट्रायकरला उभा असलेला जॉस बटलर क्रिज सोडून पुढे गेला होता. याचा फायदा घेत अश्विनने बटलरला रन आऊट केलं. अश्विनच्या अशा पद्धतीने रन आऊट करण्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच अश्विनने खेळ भावनेला ठेच पोहोचवल्याचा आरोपही काही क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकारावर आता बीसीसीआयने भाष्य केलं आहे.

अश्विनसोबतच्या वादावर बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, 'आम्हाला मंकडिंग वादावरून अश्विनला कोणतंही लेक्चर द्यायचं नाही. खेळ भावनेबद्दल अश्विनला लेक्चर द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. अश्विनने जे केलं, ते खेळाच्या नियमातलं आहे. मैदानामध्ये ज्या गोष्टी होत आहेत, त्या नियमांप्रमाण होत आहेत का नाही, हे पाहणं अंपायर आणि रेफ्रीचं काम आहे. बीसीसीआयला यामध्ये दखल द्यायची गरज नाही. शेन वॉर्न हा राजस्थान टीमचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे, त्यामुळे या प्रकरणात तो तटस्थ भूमिका मांडू शकत नाही.'

दरम्यान आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत वेगळी माहिती दिली आहे. एका आयपीएलदरम्यान धोनी आणि विराटच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत आयपीएलमध्ये कोणीही मंकडिंग करणार नाही, असं ठरल्याचं राजीव शुक्ला यांनी सांगितलं.

राजीव शुक्ला यांच्या या दाव्यावरही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. 'राजीव शुक्ला ज्या बैठकीबद्दल बोलत आहेत ती बैठक नियम येण्याच्या आधी झाली होती. नवा नियम यायच्या आधी मंकडिंग करण्याआधी बॅट्समनला ताकिद देणं गरजेचं असल्याचं ठरवलं गेलं होतं.'

धोनीने असं केलं असतं का? असा प्रश्नही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारण्यात आला. 'धोनीने असं कधीच केलं नसतं, पण याचा अर्थ अश्विनने चूक केली असा होत नाही. अश्विनला नियमांची चांगली माहिती आहे आणि तो याचा नेहमी फायदा उठवतो. यामध्ये काहीही केलं जाऊ शकत नाही,' असं उत्तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलं.