मुंबई : भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे. इंग्लंड दौऱ्यावेळी रवी शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. परदेश दौरा करणारी मागच्या १५-२० वर्षातली ही सर्वोत्तम टीम असल्याचं रवी शास्त्री म्हणाले होते. रवी शास्त्रींच्या या वक्तव्याचे पडसाद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत उमटले.
रवी शास्त्रींनी सध्याची भारतीय टीम कशी सर्वोत्कृष्ट आहे, हे बीसीसीआयच्या बैठकीत सांगायला सुरुवात केली. पण प्रशासकीय समितीच्या एका सदस्यानं रवी शास्त्रींना मध्येच रोखलं आणि आता या बैठकीच्या मुद्द्यावर या आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या धोरणांवर बोला. परदेश दौरा करणारी ही सर्वोत्कृष्ट टीम आहे का नाही ते लोकांना ठरवू दे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
खेळाडूंना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी बीसीसीआयकडून दिल्या जात आहेत. कराराच्या स्वरुपात भक्कम रक्कम, खेळाडू मागतील त्या सुविधा, खेळाडूंना हवा तो सपोर्ट स्टाफ मिळत आहे. मग बीसीसीआयनं परदेश दौऱ्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय, असा सवालही अधिकाऱ्यांनी विचारला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या हैदराबाद टेस्ट मॅचवेळी बीसीसीआयचे प्रशासकीय अधिकारी, विराट कोहली, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अजिंक्य रहाणे त्याच्या स्वभावाप्रमाणेच शांत होता. तर रोहित शर्मा मुंबईहून येणार असल्यामुळे त्याला उशीर झाला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, डायना एडुलजी, सीईओ राहुल जोहरी, आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन, साबा करीम आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसादही उपस्थित होते.