close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महिला क्रिकेटवरही मॅच फिक्सिंगचे ढग; खेळाडूला फिक्सरचा फोन

बुकी आणि मॅच फिक्सरची नजर आता टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंवर आहे.

Updated: Sep 17, 2019, 09:32 AM IST
महिला क्रिकेटवरही मॅच फिक्सिंगचे ढग; खेळाडूला फिक्सरचा फोन

मुंबई : बुकी आणि मॅच फिक्सरची नजर आता टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंवर आहे. फिक्सर्स महिला क्रिकेटपटूंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या एका महिला खेळाडूशी फिक्सरने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वनडे सीरिजदरम्यान असा प्रयत्न झाला. यानंतर त्याला खेळाडूंना संपर्क करु नकोस, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं.

फिक्सरने संपर्क केल्याची माहिती महिला क्रिकेटपटूने आयसीसीला सांगितली. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने बंगळुरूमध्ये दोन जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

काहीच दिवसांपूर्वी टीएनपीएल (तामीळनाडू प्रिमियर लीग)मध्ये मॅच फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं होतं. आपल्याला अनोळखी व्यक्तींकडून संपर्क करण्यात येत आहे आणि विशेष संदेश देण्यात येत आहे, अशी तक्रार खेळाडूंनी केली होती.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार काही मॅच फिक्सर टीएनपीएलला आपल्या नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तसंच टीमच्या मालकांशी त्यांचा संपर्क आहे. सट्टेबाजीसाठी फायदा होण्यासाठी टीम संचालन तशाप्रकारे करण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप होत आहे.