close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्मिथकडून गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी

वर्षभराच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं.

Updated: Sep 16, 2019, 04:13 PM IST
स्मिथकडून गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी

मुंबई : वर्षभराच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं. ऍशेस सीरिजमध्ये स्मिथने तब्बल ७७४ रन केले. याचबरोबर स्मिथने सुनिल गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ३० वर्षांच्या स्मिथने ४ टेस्टच्या ७ इनिंगमध्ये ११०.५७ च्या सरासरीने ७७४ रन केले. यामध्ये ३ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. दुखापतीमुळे स्मिथला लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करता आली नाही. तर दुखापतीमुळे त्याला एका टेस्टलाही मुकावं लागलं. दुखापत झाली नसती तर स्मिथला आणखी ३ इनिंग खेळण्याची संधी मिळाली असती.

स्मिथ हा ४ टेस्ट मॅचची सीरिज खेळून ७७४ किंवा त्यापेक्षा रन करणारा जगातला तिसरा खेळाडू बनला आहे. १९७०-७१ मध्ये सुनिल गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ४ टेस्ट मॅचमध्ये ७७४ रन केले होते.

व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी १९७६ साली इंग्लंडविरुद्ध ४ टेस्ट मॅचमध्ये ११९.४२ च्या सरासरीने ८२९ रन केले होते. या सीरिजमध्ये रिचर्ड्सनी ३ शतकं आणि २ अर्धशतकं केली होती.

जगात फक्त ७ खेळाडूंनीच एका टेस्ट सीरिजमध्ये ४ टेस्ट मॅच खेळून ७०० पेक्षा जास्त रन केले. सुनिल गावसकर हे या यादीतले एकमेव भारतीय आहेत. गावसकर यांच्याशिवाय, व्हिव्हियन रिचर्ड्स, स्टीव्ह स्मिथ, ग्रॅहम गूच, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि जॉर्ज हेडली यांनी असा विक्रम केला आहे. स्मिथला हे रेकॉर्ड दोनदा करता आलं आहे.

विराट कोहलीने २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ६९२ रन केले होते, यामध्ये ४ शतकांचा समावेश होता. याशिवाय दिलीप सरदेसाई आणि राहुल द्रविड यांनीही एका सीरिजमध्ये ६०० पेक्षा जास्त रन केल्या होत्या. सचिन तेंडुलकरला एकाही सीरिजमध्ये ६०० रनचा टप्पा गाठता आला नाही.