दुबई: टी 20 वर्ल्ड कपचे सामने सुरू आहेत. पाकिस्तान संघ सलग तीन सामने जिंकला आहे. यंदा न्यूझीलंडलाही पाकिस्तानच्या टीमने पराभूत केलं आहे. टीम इंडियाला पहिलाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता न्यूझीलंड विरुद्धचा सामना टीम इंडियाला जिंकणं महत्त्वाचं आहे. जर हा सामना जिंकला नाही तर टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याच्या शक्यता दाट आहेत. दुसरीकडे पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सने 2021 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन कोणते संघ पोहोचणार हे सांगितलं आहे. दुबईमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात 2 कोणते संघ खेळणार याची भविष्यवाणी केली आहे.
दुबईत 14 नोव्हेंबरला अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल असा दावा बेन स्टोक्सने केला आहे. पाकिस्तान 2009 च्या T20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन ठरला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या सलग तिसऱ्या विजयानंतर स्टोक्सचा दावा आहे की पुन्हा एकदा पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी खेळेल. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.
England vs Pakistan Final ???
— Ben Stokes (@benstokes38) October 29, 2021
बेन स्टोक्सने ट्वीट केलं आहे की यावेळी फायनल पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असं म्हणत प्रश्नचिन्हं दिलं आहे. बेन स्टोक्सने इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान फायनल होईल अशी भविष्यवाणी केल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं. रिझवान आणि बाबरने मिळून टीम इंडियाने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं होतं. त्या पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्ध सामन्यातही पाकिस्तान संघाने दमदार कामगिरी केली. न्यूझीलंड आणि त्या पाठोपाठ आता अफगाणिस्तान संघाचाही पाकिस्ताननं पराभव केला आहे.