वनडे सीरिजआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियापुढे आता वनडे सीरिजचं आव्हान असणार आहे. 

Updated: Dec 13, 2019, 04:48 PM IST
वनडे सीरिजआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का title=

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियापुढे आता वनडे सीरिजचं आव्हान असणार आहे. १५ डिसेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. पण या सीरिजआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. २०१९ या वर्षात भुवनेश्वर कुमार बराच काळ दुखापतीमुळे टीमबाहेर होता.

मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार ४ महिने टीमबाहेर होता. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजसाठी भुवनेश्वरची निवड करण्यात आली होती. एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार तिसऱ्या टी-२०वेळी भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली. २०१८ सालीही दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्याला जाऊ शकला नव्हता. मागच्या २२ महिन्यात भुवनेश्वर एकही टेस्ट मॅच खेळला नाही. भुवनेश्वर कुमारच्या बदली खेळाडूची टीम इंडियाने अजून निवड केलेली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला हा दुसरा धक्का आहे. याआधी ओपनर शिखर धवनही दुखापतीमुळे बाहेर झाला. शिखर धवनऐवजी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या मॅचमध्ये धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. धवनच्या गुडघ्याला टाके पडले होते, हे टाके आता काढण्यात आले असले तरी त्याला दुखापतीतून सावरायला वेळ लागणार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

टी-२० सीरिजसाठीही शिखर धवनची निवड झाली होती, पण दुखापतीनंतर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला निवडण्यात आलं. पण सॅमसनला एकाही मॅचमध्ये अंतिम-११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये या सीरिजची पहिली मॅच होईल. यानंतर १८ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आणि २२ डिसेंबरला कटकमध्ये मॅच होतील.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी