पटणा : एकीकडे भारताचे फास्ट बॉलर परदेशामध्ये बॅट्समनची भंबेरी उडवत आहेत तर रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये एका डावखुऱ्या स्पिनरनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बिहारच्या आशुतोष अमन यानं रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. आशुतोष अमन यानं यंदाच्या मोसमात प्लेट ग्रुपमधल्या ७ रणजी मॅचमध्ये तब्बल ६५ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर अमन यांनं बिशनसिंग बेदी यांचं ४४ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे. बिशनसिंग बेदी यांनी १९७४-७५ सालच्या रणजी मोसमात ६४ विकेट घेतल्या होत्या.
आशुतोष अमनच्या या कामगिरीचा फायदा बिहारलाही झाला आहे. प्लेट गटामध्ये बिहारनं ८ पैकी ६ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे ४० अंकांसह बिहार प्लेट ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आशुतोषनं सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि नागालँडविरुद्ध मॅचमध्ये १० विकेटही घेतल्या.
फक्त बॉलिंगच नाही तर आशुतोष अमननं या मोसमात चांगली बॅटिंगही केली आहे. आशुतोषनं सिक्कीमविरुद्ध ८९ आणि मिझोरामविरुद्ध १११ रन केले होते.
आशुतोष अमन याचा जन्म बिहारच्या गयामध्ये १९ मे १९८६ साली झाला होता. ३२ वर्षांचा अमन बिहारकडूनच रणजी ट्रॉफी खेळतो. आशुतोष अमन हा डावखुरा स्पिनर आहे. गयाच्या डेल्हामध्ये राहणारा आशुतोष सैन्यात नोकरी करतो. पहिले आशुतोष अमन क्लब क्रिकेट खेळायचा. बिहारमध्ये १८ वर्षानंतर क्रिकेटचं पुनरागमन झालं तेव्हा त्याला आपल्या राज्याकडून खेळण्याची संधी मिळाली.