'तो सचिन आणि माझ्यापेक्षा टॅलेंटेड होता पण...'; 'त्या' खेळाडूबद्दल लाराने व्यक्त केली खंत

Brian Lara Big Claim: कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ज्या मोजक्या क्रिकेटपटूंकडे पाहिलं जात त्यामध्ये ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. मात्र आता लारानेच त्या दोघांपेक्षा एक खेळाडू फार सरस होता असं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 17, 2024, 08:36 AM IST
'तो सचिन आणि माझ्यापेक्षा टॅलेंटेड होता पण...'; 'त्या' खेळाडूबद्दल लाराने व्यक्त केली खंत title=
लाराने उघडपणे केलं मान्य

Brian Lara Big Claim: कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा या दोघांची नाव वगळता येणार नाहीत. जगातील सर्वोत्तम कसोटीपटूंमध्ये आजही या दोघांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र असं असतानाच आता खुद्द ब्रायन लाराने एका खेळाडूचं कौतुक करताना तो सचिन आणि माझ्यापेक्षाही उत्तम होता असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे 2003 मध्ये निवृत्त झालेल्या खेळाडूबद्दल लाराने हे विधान केलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

'ईएसपीएनक्रिकइन्फो'वर ब्रायन लाराने लिहिलेल्या एका लेखामध्ये या खेळाडूच्या खेळण्याच्या पद्धतीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तो जेव्हा फलंदाजीला यायचा तेव्हा सर्वच खेळाडू हातातलं काम टाकून त्याचा खेळ पाहायचे, असंही लाराने म्हटलं आहे. लाराने या खेळाडूच्या फलंदाजीची शैली फारच अप्रतिम होती असं आवर्जून नमूद केलं आहे. आता 400 धावांचा विक्रम करणाऱ्या लाराने कौतुक केलेला हा खेळाडू कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे कार्ल हूपर! त्याच्याबद्दल बोलताना लाराने, "काय जबरदस्त खेळाडू होता तो! तो ज्या सहजतेने फलंदाजी करायचा ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटायचं. अगदी आम्ही नवे खेळाडूचं नाही तर वरिष्ठ खेळाडूही आश्चर्यचकित व्हायचे," असं म्हटलं आहे.

माझ्यापेक्षा रिचर्ड्स यांना तो अधिक आवडायचा...

कार्ल हूपरबद्दल बोलताना लाराने, "तो फारच टॅलेंटेड होता. मात्र आपण किती उत्तम खेळतो हे त्याला ठाऊक नव्हतं, असं वाटतं. त्याने त्याच्या कौशल्याला न्याय देणारी कामगिरी का केली नाही, असं लोक विचारतात. मात्र याबद्दल थेट काही कारणं देता येणार नाहीत," असं लारा म्हणाला. वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या विवियन रिचर्ड्स यांनाही आपल्यापेक्षा कार्ल जास्त आवडयचा असा दावा केला आहे. "विव यांनाही कार्ल आवडायचा. मी त्यांना जितका आवडायचो त्यापेक्षा कैक पटीने त्यांना कार्ल आवडायचा, हे मी खात्रीने सांगू शकतो. मात्र त्यांनी कधी हे थेट दाखवलं नाही," असं ब्रायन लारा म्हणाला.

नक्की पाहा हे फोटो >> 'सुंदर अशा...', शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; 'ती' पोस्ट Viral

तो सध्या काय करतो?

हूपरने 102 कसोटींमध्ये 5762 धावा केल्या आहेत. तर सचिनने 200 कसोटींमध्ये 15 हजार 921 धावा केल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण कार्ल हूपर हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने 5 हजार धावा, 100 विकेट्स आणि 100 झेल घेतले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये असं करणारा तो पहिला क्रिकेटपटू असून त्यानंतर केवळ जॅक कॅलिसला हा पराक्रम करता आला आहे. कार्ल हूपर हा वेस्ट इंडिजच्या सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. सध्या तो निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून यशस्वी उद्योजक आहे.