युवराजच्या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

उद्धव ठाकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव

Updated: Dec 6, 2019, 12:09 PM IST
युवराजच्या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांकडून अभिनंदन केलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगती करेल, असं ट्विट युवराज सिंगने केलं होतं. युवराज सिंगच्या या ट्विटला उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुझ्या लखलखत्या खेळींप्रमाणेच महाराष्ट्र विकासआघाडी राज्याच्या विकासासाठी महान इनिंग सुरु करण्यासाठी तयार आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान मोदी येत आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री ठाकरे हे पुण्यातील विमानतळावर मोदींच्या स्वागताला जाणार आहेत.

पुण्यात पोलीस महासंचालकांची बैठक होत आहे. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. मोदी हे आज रात्री ९.५० वाजता पुण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे जाणार आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे उत्सुकता लागलेली आहे.