कोलकाता : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. या कालावधीमध्ये देशात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये सौरव गांगुली गरजूंच्या मदतीला धावला आहे. सौरव गांगुली या गरजूंना ५० लाख रुपयांचे तांदूळ देणार आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी ज्यांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्यांना दादा मदत करणार आहे.
५० लाख रुपयांचे तांदूळ देण्यासाठी गांगुली आणि लाल बाबा राईस यांच्यात करारही झाला आहे. गांगुलीप्रमाणेच इतर लोकंही गरजूंची मदत करण्यासाठी पुढे सरसावतील, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.
याआधी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पश्चिम बंगाल सरकारला २५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. सीएबीचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी राज्य सरकारला मदत करणार असल्याची घोषणा केली होती.